अजित पवार दिल्लीचे चरणदास, संजय राऊतांचा टोला; शरद पवारांनाही दिला खोचक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 04:56 PM2023-11-11T16:56:21+5:302023-11-11T16:56:33+5:30
एवढ्या मोठ्या नेत्याला अमित शाह भेटायला येऊ शकतात. पण आजारी माणसाला अंथरूनातून उठून दिल्लीला जावं लागते, ही महाराष्ट्रावर आलेली वेळ आहे असं राऊत म्हणाले.
मुंबई – अमित शाह यांच्या भेटीमागचं कारण काहीही असले तरी मराठीचा स्वाभिमान राजकारणासाठी बाजूला ठेऊन दिल्लीचे चरणदास झालेले आहेत. आपण कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही, आपण आजारी आहात, थकवा आलाय, शरीर कमजोर झालंय. हा तुमचा प्रश्न आहे. पण आपल्याकडे आजारी माणसाला लोक भेटायला येतात. परंतु आजारी माणूस दिल्लीला त्यांच्या नव्या नेत्याला भेटायला जातो हे दुर्दैव आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, शरीराने, मनाने आजारी असलेला माणूस, अजित पवारांना विश्रांतीची गरज आहे. अजित पवारांना भेटायला आले पाहिजे होते, शरद पवारांच्या घरातून फोडलेला एवढा मोठा नेता ते आजारी पडलेले आहेत. त्यांच्यासोबत ४० आमदार आहेत असं म्हणतात, एवढ्या मोठ्या नेत्याला अमित शाह भेटायला येऊ शकतात. पण आजारी माणसाला अंथरूनातून उठून दिल्लीला जावं लागते, ही महाराष्ट्रावर आलेली वेळ आहे असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.
तसेच कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतील. कुटुंब वैगेरे ठीक आहे, परंतु हे संभ्रमाची स्थिती निर्माण करणारे आहे. आमचेही कुटुंब आहे. उद्धव ठाकरेंचे कुटुंब नाही. एकनाथ शिंदे आमचेही मित्र होते, त्यांच्यासोबत अनेक जण गेलेत, त्यांच्यासोबत आमचेही घरोब्याचे संबंध होते. पण त्यांनी महाराष्ट्राच्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही महाराष्ट्राचे नुकसान केले. अशावेळी श्रीकृष्णाने सांगितलंय, युद्धभूमीवर काका, मामा, भाऊ नाती नसतात. शस्त्र असते, आपण योद्धे आहोत, आपल्याला युद्ध जिंकायचं, संभ्रम निर्माण करायचा नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी अजित पवार-शरद पवार भेटीवर दिली.
दरम्यान, आम्ही प्रखर हिंदुत्ववादी म्हणून भगवतगीतेतील श्रीकृष्णाचा संदेश पाळतो, युद्धभूमीवर कुणी कुणाचे नसते, अर्जुन शस्त्र उचलतो आणि घाव घालतो, तुम्ही एकमेकांसोबत बसून चकल्या लाडू खायचे, मग कार्यकर्त्यांनी लढायचे हे असं चालत नाही. हे माझे मत आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसही त्याच मताचे आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.