मुंबई - हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सरकारवर लेटर बॉम्ब फोडला आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा. ५०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगमुळे शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसतं असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांनी पत्र पाठवून म्हटलंय की, आपल्या नेतृत्वाखाली सरकारने सहकारी क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले त्याबद्दल अभिनंदन. भाजपाचे काही नेते जे आपल्या अंतस्थ गोटात वावरत असतात ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार, त्यांचे साखर कारखाने याबाबत भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत आहेत. या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराही लावला जातो. भ्रष्टाचारास धर्म व राजकीय पक्ष नसतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट होणे गरजेचे आहे या मताचा मी आहे असं त्यांनी म्हटलं.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराची गैरव्यवहाराची प्रकरण म्हणजे सरळ सरळ ५०० कोटी रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग केले आहे. कोल्हापूरातील हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे व या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे असं संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, भाजपाच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सूत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत. पण सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून बसलेत. जनतेच्या पैशांची प्रचंड लुटमार या कारखान्यात खाली आहे. हे सर्व प्रकरण तात्काळ ईडी, सीबीआयच्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाजपा आमदार राहुल कूल आहेत. त्यामुळे या प्रकरणात संजय राऊतांनी थेट भाजपावर आरोप करत कारखान्याच्या संचालक मंडळाची यादी देवेंद्र फडणवीसांना पाठवली आहे. PMLA कायद्याने यावर कारवाई व्हावी आणि घोटाळे संचालक मंडळाने केले आहेत. त्याला राजकीय वरदहस्त लाभला असल्याने ते बिनधास्त आहेत. या शेतकऱ्यांच्या फसवणुकीला सरकारी पाठिंबा आहे का? असा सवालही संजय राऊतांनी विचारला आहे.