संजय राऊतांची अजित पवारांबद्दल राजकीय भविष्यवाणी; म्हणाले, "बारामतीतून..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 01:40 PM2024-09-09T13:40:33+5:302024-09-09T13:41:18+5:30
Sanjay Raut Ajit Pawar : बारामतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या विधानाने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात आता खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांबद्दल राजकीय भविष्यवाणी केली.
Sanjay Raut Ajit pawar Baramati Vidhan Sabha : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामतीत बोलताना एक विधान केले. 'एकदा बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे', असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या विधानाचे आता वेगवेगळे अर्थ राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. दरम्यान, शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या विधानसभा निवडणुकीतील निकालाबद्दल मोठी राजकीय भविष्यवाणी केली.
लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघातूनच मताधिक्य मिळाले नाही. याची सल अजित पवारांना असून, त्यांच्या बोलण्यातून सातत्याने ते दिसत आहे. बारामतीकरांनी लोकसभेला साथ न दिल्याची नाराजी अजित पवारांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली.
बारामतीला दुसरा आमदार मिळाला पाहिजे - अजित पवार
"जेथे पिकते तिथे विकत नाही. एकदा बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीची आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा", असे अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या याच विधानावर बोलताना संजय राऊतांनी एक राजकीय भाकित केले.
अजित पवारांनाही याची कल्पना आहे -संजय राऊत
खासदार संजय राऊत अजित पवारांबद्दल बोलताना म्हणाले की, "अजित पवार हे बारामतीतून निवडणूक हरणार, हे निश्चित आहे. त्यांनाही याची कल्पना आहे. त्यामुळे आता मी त्यांच्यावर काय बोलू?"
"तुम्ही तुमचे घर मोडले. तुमचा पक्ष सोडला. शरद पवार, जे तुमचे नेते आहेत आणि जे तुमच्या वडिलांसारखे आहेत. ज्यांनी तुम्हाला सर्व काही दिले, त्यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. आता तुम्ही खंजीर खुपसला असेल, तर पश्चात्ताप करुन काय उपयोग?", असा सवाल संजय राऊत यांनी केला.