मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण शहराचा दौरा केला. यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांना धीर देताना पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची सर्वकष योजना जाहीर केली जाईल असं सांगितलं. यावेळी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी महिलेवर दमदाटी केल्याचा प्रकार घडला, याचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल होतोय. या दमदाटीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'भास्कर जाधवांचा व्हिडिओ मी पाहिला नाही, फक्त वृत्तपत्रांमध्ये वाचलं. या प्रकरणावर स्वतः भास्क जाधव स्पष्ट बोलू शकतील. पण, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणं गरजेचं आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार हे करतचं आहेत', असे संजय राऊत म्हणाले.
Chiplun: 'भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही'
श्रीमंत मुंबईकरांनी मदतीसाठी पुढं यावंसंजय राऊत पुढ म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती आहे. कोकणावर सर्वाधिक संकट कोसळलंय, लाखो लोक बेघर झालेत. अनेकांचे जीव गेले आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत. महाराष्ट्र सरकारचा त्यांना सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे, पण केंद्र सरकारनेसुद्धा जास्तीत जास्त मदत महाराष्ट्राला करावी लागेल. तसेच मुंबई शहरात अनेक धनिक लोक आहेत, त्यांनीसुद्धा आता महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं. ही सगळ्यांची जबाबदारी आहे, महाराष्ट्राने ज्याला कोणाला दिलंय, त्या सगळ्यांची जबाबदारी आहे महाराष्ट्राला उभं करायची. जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये मुंबईचे अनेक जण आहेत, त्यांनी सुद्धा मदत करायला हवी, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.
काय म्हणाले भास्कर जाधव ?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणमधील व्यापाऱ्यांशी चर्चा करत असतानाच एका महिलेने ओक्साबोक्शी रडत तिची वेदना मांडली. 'पुराचे पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचलं, त्यात सर्वकाही वाहून गेलंय. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला मदत करा. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो', अशी विनवणी तिने केली. तसच, सर्व आमदार खासदारांचा दोन महिन्यांच्या पगार कोकणला मदत म्हणून द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी भास्कर जाधवांनी 'आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय,' असे म्हटलं आणि मुख्यमंत्र्यांसोबत चालणाऱ्या ताफ्याला तिथून पुढे सरकरण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्री थोडे पुढे गेल्यानंतर जाधव यांनी, 'तुझा मुलगा कुठंय??? तुझ्या आईला समजव. उद्या भेट,' असंही दमदाटी केल्याच्या स्वरात सांगितल्याचं सर्वांनी पाहिलं. याच व्हिडीओवरुन आता विरोधक भास्कर जाधवांवर टीका करताना दिसत आहेत.