मुंबई - भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेनंतर राणे आणि शिवसेनेमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. (Sanjay Raut) यादरम्यान, राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या एका विधानावरून राणेंवर अटकेची कारवाई झाली होती. तर त्यानंतर नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी संजय राऊत सापडतील तिथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिला होता. निलेश राणेंचा इशारा आणि राणे विरुद्ध शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. (Sanjay Raut's security increased after Nilesh Rane's warning of correct program, 6 jawans deployed, tight security near his house)
संजय राऊत यांचे निवासस्थान आणि सामनामधील कार्यालयातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच संजय राऊत यांच्या सुरक्षेसाठी सहा शस्त्रधारी जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, या सुरक्षा व्यवस्थेबाबत डीसीपी प्रशांत कदम यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. संजय राऊत यांच्याबरोबरच त्यांचे भाऊ सुनील राऊत यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या सुरक्षेत स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या सहा जवानांसोबत १२ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याबरोबरचा साध्या वेशातील पोलिसांची सुरक्षाही राऊत यांना देण्यात आली आहे.
शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वादानंतर दोन्हीकडून जोरदार शाब्दिक हल्ले होत होते. यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत हे आघाडीवर राहून नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत होते. त्याचदरम्यान, निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते जिथे भेटतील तिथे करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिला होता.