बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा आंदोलन पेटले आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी येथील जमिनीचे सर्वेक्षण करण्यात येत असून, त्याविरोधात हजारो ग्रामस्थ बारसूमधील सड्यावर जमले आहेत. तसेच त्यांच्याकडून पोलीस आणि अधिकाऱ्यांची वाट अडवण्यात येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या आंदोलनावरून सनसनाटी दावा केला आहे. बारसूमधील रहिवाशांना धमक्या दिल्या जात आहेत. तसेच हे आंदोलक तिथून हटले नाहीत तर त्यांच्यावर गोळ्यासुद्धा झाडल्या जातील आणि जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूमध्येही हत्याकांड घडवलं जाईल, अशी मला भीती वाटतेय, असा दावा राऊत यांनी केला आहे.
या प्रकरणी प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. कालपासून सुमारे ५ ते सहा हजार लोक बारसूच्या माळरानावर जमले आहेत. आम्ही मरू गोळ्या खाऊ पण मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे पोलिसांना हाताशी धरून बारसूमधील रहिवाशांवर ज्याप्रकारे खारघरमध्ये सदोष मनुष्यवध केला, त्या प्रमाणे गोळ्या चालवू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. आज पाच हे सहा हजार कुटुंबं विरोध करण्यासाठी माळरानावर जमलेली आहेत. अनेक कुटुंब परागंदा झाली आहेत. अनेक कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलावून २४ तास बसवून ठेवून धमक्या दिल्या जात आहेत. बारसूमधील हजारो ग्रामस्थांना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे तर जे बारसूचे रहिवासी मुंबईत राहत आहेत आणि ज्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे त्यांच्या मुंबईतील घरांवर लाथा मारून पोलीस घरात घुसताहेत. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. मुंबईतील बारसूवासियांना अटक केली जातेय, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, हे अत्यंत विकृत मनोवृत्तीचं सरकार आहे. हे दहशतवादी मनोवृत्तीचं सरकार आहे. मला असं वाटतं की, बारसूमधील हे लोक तिथून हटले नाही, तर त्यांच्यावर गोळ्यासुद्धा झाडल्या जातील आणि जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूमध्येही हत्याकांड घडवलं जाईल, अशी मला भीती वाटतेय. उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. कदाचित मुंबईला तिथे लक्ष घालावं लागेल आणि आम्हाला तिथे जावं लागेल. आम्ही जनतेसोबत आहोत. जनतेने विरोध केलेला आहे. जनता छातीवर गोळ्या झेलण्यास तयार आहे. जनता तुरुंगात जायला तयार आहे, अशावेळी शिवसेना ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
शशिकांत वारिसे यांचा मृत्यू झाला. हा मृत्यूनसून हत्या होती. आता तिथे सामुहिक हत्याकांड होऊ शकतं. कारण त्या भागामध्ये महाराष्ट्राबाहेरच्या अनेक परप्रांतियांनी जमिनी घेतल्या आहेत. त्या जमिनीचं मोल कमी होऊ नये म्हणून, त्यांची गुंतवणूक अडचणीत येऊ नये म्हणून धाकदपटशाही करून रिफायनरी करावी हे सरकारचं धोरण आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.