संजय राऊतांचं वक्तव्य निषेधार्ह, त्याचं समर्थन होऊ शकत नाही, पण... काँग्रेसने मांडली स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 03:54 PM2023-03-01T15:54:10+5:302023-03-01T15:55:12+5:30
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी विधानमंडळाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. विधिमंडळाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही, तो राज्याच्या जनतेचाही अपमान आहे.
मुंबई - खासदार संजय राऊत यांनी विधानमंडळाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. विधिमंडळाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही, तो राज्याच्या जनतेचाही अपमान आहे. भाजपाने त्यासंदर्भात हक्कभंग ठराव आणला होता. सभागृहात कोणाचाही विरोध नव्हता. अध्यक्षांनी यावर तातडीने निर्णय द्यावा व जनतेचे प्रश्नही महत्वाचे आहेत त्यावर चर्चा व्हायला हवी होती पण जनतेच्या प्रश्नावर चर्चा होऊ नये म्हणून सत्तापक्षाकडून ठरवून सभागृह बंद पाडण्यात आले, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महागाई वाढलेली आहे, गॅस सिलेंडरचे दरही वाढले आहेत, महागाई, दरवाढ करुन सरकार जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, कृषीपंपाचे वीज कनेक्शन कापले जात आहे. या सर्व मुद्द्यांवर सभागृहात चर्चा व्हावी अशी विरोधी पक्षांची भूमिका होती. जनतेचे हे महत्वाचे प्रश्न असून त्यावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे होती पण सत्ताधाऱ्यांनी ती होऊ दिली नाही. जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्यावे लागेल म्हणून रणनिती ठरवून सत्ताधारी पक्षाने आज कामकाज होऊ दिले नाही.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. घरगुती गॅसचे दर कमी करा, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज द्या, नाहीतर खूर्च्या खाली करा. देशद्रोदी सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा, अशा घोषणा देण्यात आल्या.