मुंबई - काँग्रेस, शिवसेना-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागावाटपामध्ये कुठलेही मतभेद नाही. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती असल्याने आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांची हरकत नसल्याने वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे असं आम्ही मानतो असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांसोबत आमची चर्चा आणि वाटाघाटी सुरू आहे. देशात हुकुमशाही नसावी यासाठी प्रकाश आंबेडकर राज्यात आणि देशात आवाज उचलतायेत. प्रकाश आंबेडकर केवळ राज्याचे नाही तर देशातील वंचिताचे नेते आहेत. त्यामुळे ते आमच्या महाविकास आघाडीचे घटक आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच जागावाटपाबाबत राज्यातील काँग्रेसमध्ये कुणाला अधिकार आहे मला माहिती नाही. काँग्रेसच्या हायकमांडने जी ५ सदस्य समिती बनवली आहे. त्यांच्यासोबत आमची चर्चा सुरू झालीय. प्राथमिक चर्चा आम्ही या समितीसोबत करत आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना-वंचित बहुजन आघाडीसोबत आमची चर्चा सकारात्मक आहे. मतभेद दिसत नाही. शिवसेना-राष्ट्रवादीची चर्चा संपली. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे असं राऊतांनी सांगितले.
...हे लोकशाहीचे दुर्दैव
निवडणुका आता सहा महिन्यावर आल्या आहेत. १० जानेवारीला काय निकाल लागतो याकडे देशाचे लक्ष आहे. मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत. राज्यात आणि देशात घटनाबाह्य सरकार सुरू असताना सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग हे घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देतायेत हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. अदानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्यावर काही बोलणार नाही. अदानींना क्लीनचीट दिली मग इतरांना न्याय का मिळत नाही. घटनाबाह्य सरकारविरोधात राज्यातील जनता आवाज उचलतेय. कोर्टाचे दरवाजे ठोठावत आहे. मग अद्याप आमदार अपात्रतेबाबत निकाल का लांबवला जातोय? अशा प्रकारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.
संजय राऊत म्हणाले की, या देशात उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात आणि शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नसल्याने तो आत्महत्या करतो. अदानींची संपत्ती ही भाजपाची संपत्ती आहे. त्यांच्यामुळे देश श्रीमंत झाला असं मानत नाही. धारावी, मिठागर, मुंबई देशातील एअरपोर्ट यासारखे एकाच उद्योगपतीला दिल्यावर अदानी श्रीमंत होणारच. श्रीमंत होण्यास हरकत नाही. परंतु सामान्य मजूर, कष्टकरी श्रीमंत झालाय का? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालंय का? ज्याच्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. भाजपाने यावर उत्तर द्यावे असं त्यांनी मागणी केली आहे.
देश ५ हजार वर्ष मागे जाईल
हा देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे पुढे जाईल. शिक्षण आणि आधुनिकता त्यावर पुढे जाईल आणि महाशक्ती बनेल. देश जर कुणी ५ हजार वर्ष मागे घेऊन जात असेल तर या देशात जंगल राहील आणि जंगलाचे कायदे येतील. देश पुढे जायला हवा. देशातील युवकांना रोजगार मिळायला हवा. शेतकऱ्यांना चांगले जीवन मिळायला हवे. कुणाला हे करायला जमत नसेल तर हा देश ५ हजार वर्ष मागे घेऊन जात लोकांना धर्माच्या नावावर तेढ निर्माण केले जात आहे असं राऊतांनी सांगितले.
राहुल गांधींच्या यात्रेचा फायदा
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेतून आम्हाला फायदा होईल. ज्या भागातून ही यात्रा जाईल तिथे काँग्रेसला मोठा फायदा होईल. या यात्रेतून वातावरण निर्मिती होईल अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.