‘यूपीए आता आहेच कुठे? यूपीए आता नाही’, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’चे अस्तित्वच नाकारले. तसेच, त्या ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी बुधवारी हे भाष्य केले. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "ममता या देशातील मोठ्या नेत्या आहेत. मुख्यमंत्री आणि भाजप विरोधातील या लढाईत त्या महत्वाच्या योद्धा आहेत. त्यांचा लढा प्रेरणादायी आहे. युपीए कुठे आहे? हा ममतांचा प्रश्न योग्य आहे," असे राऊत यांनी म्हटले आहे. (Sanjay Raut's valuable advice to Mamata Banerjee)
राऊत म्हणाले, "ममतांप्रमाणेच ऊद्धव ठाकरेंनीही असाच प्रश्न विचारला आहे. युपीए आक्रमक व्हायला हवे. जर युपीए नाही, तर एनडीए तरी कुठे आहे, असेही ऊद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत तिसरी आणि चौथी आघाडी बनली, त्याचा फायदा भाजपला झाला. मग ही जी आघाडी उभी राहत आहे त्याचा काय फायदा होईल? याचा विचार करायला हवा. आम्ही राज्यात तीन वेगवेगळे पक्ष आहेत. आमचे मतभेत आहेत पण तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. यामुळे कांग्रेसला दूर ठेवून फ्रंट बनू शकत नाही. इतर राज्यांत कांग्रेसचा बेस आहे. सगळ्यांनी एकत्र यायला हवे, असे आमचे म्हणणे आहे."
राज्यात महाविकास आघाडी ही युपीएचाच एक भाग आहे. ममतांनी त्यांचे मत मांडले आहे, आम्ही त्यांच्या लढ्याचा आदर करतो. पवार साहेबांनीही म्हटले आहे, की भाजपला रोखले पाहीजे. आम्ही पुन्हा ममतांना भेटू आणि त्यांनाही यासंदर्भात समजून सांगू. सोनिया गांधींच्या नेतृत्वावर कुणीही आक्षेप घेतलेला नाही. चर्चा करून यावर तोडगा काढू. आत्ता सुरवात झाली आहे. ऊद्धवजींशी चर्चा करू. आम्ही विचार ठेवला होता की, काँग्रेसला घेऊन सोबतच पुढे जायचे. कारण काँग्रेसला सोडले तर मतांचे विभाजन होईल," असेही राऊत म्हणाले.
सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच -यावेळी, सावरकरांचे खरे वारसदार आम्हीच आहोत. त्यांचा विचार बाळासाहेबांनीच पुढे नेला. हिंदूत्वाबद्दल आम्ही कधीही यू टर्न घेतलेला नाही. तुम्ही सांगा, तुम्ही सावरकरांना का भारत रत्न देत नाही, असा सवालही राऊत यांनी भाजपला केला.