Shiv Sena vs. Eknath Shinde: गुवाहाटीमध्ये दाखल झालेले शिवसेनेचे बंडखोर आमदार आता प्रसार माध्यमांना दूरध्वनीच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजत राऊत यांनी आमदारांना करण्यात आलेल्या मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत. शिवसेनेच्या आमदारांना जबरदस्तीनं सूरतला डांबण्यात आलं आहे आणि त्यांना मारहाण करण्यात येत आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत विचारण्यात आलं असता सध्या गुवाहाटीमध्ये असलेले आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांचा दावा फेटाळून लावला. राज्यातील राजकीय घडामोडींचे LIVE UPDATES येथे क्लिक करा
"आमदारांना मारुन वगैरे कसं ठेवता येईल. आमदार म्हणजे काय छोटा माणूस असतो का त्यांना डांबून ठेवायला? संजय राऊत काय बोलतील त्यांचं त्यांना ठावूक आणि त्यांना अशी माहिती कुठून मिळते हे देवच जाणे", असं आमदार संजय शिरसाट म्हणाले. तसंच आम्ही सर्वजण आमच्या मर्जीनं आणि एकदिलानं इथं उपस्थित आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं, पण तोवर डोक्यावरुन पाणी गेलंय- बच्चू कडू
आमदार नितीन देशमुख यांची प्रकृती ठिक नसल्याची माहिती समोर आली होती. त्याबाबतही माहिती देताना संजय शिरसाट यांनी नितीन देशमुख यांची प्रकृती एकदम उत्तम असून ते आनंदी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांशीही बोलणं झालं आहे, असंही शिरसाट यांनी स्पष्ट केलं. शिंदेंसोबत गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसेनेचे ३५ आणि अपक्ष ५ आमदार असे एकूण ४० आमदार असल्याची माहिती देखील शिरसाट यांनी दिली. तसंच दुपारपर्यंत हा आकडा ४६ ते ५० पर्यंत जाईल असाही दावा शिरसाट यांनी केला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराजी"आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराजी आहे. नेतृत्वावर नाराजीचा प्रश्नच नाही. पुढे काय करायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. मधला काळ कोरोनात गेला आणि उद्धव साहेबांची तब्येत देखील ठिक नव्हती. त्यामुळे अडीच वर्ष गेली. आता एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला असावा आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत", असं संजय शिरसाट म्हणाले.