Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group News: राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लहान मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यानंतर विरोधकांकडून महायुती सरकारवर टीका करण्यात येत आहे. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेचा सत्ताधारी महायुतीचे नेते खरपूस शब्दांत समाचार घेत आहेत.
राज्यात आणि देशात असे अनेक एन्काउंटर आम्ही पाहिले आहे. मला जितकी अंडरवर्ल्डची माहिती आहे, तेवढे गृहमंत्री आणि एन्काउंटर करणाऱ्यांना माहिती नाही. संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर पोस्कोअंतर्गत का गुन्हा दाखल केला, आरोपीने आपल्या जबाबात काही खुलासे केले होते म्हणून त्याचे एन्काउंटर झाले. कुणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर केला. एका शिंदेचा एन्काउंटर झाला. दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. याला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले.
संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला
संजय राऊत यांच्या डोक्यावर झालेल्या परिणामच हे लक्षण आहे. इतका महामूर्ख माणूस राजकारणामध्ये बोलू शकतो, हे ठाकरे गटातच होऊ शकते. जेल भोगून आल्यावर बेलवर असलेला माणूसच असे बेताल वक्तव्य करू शकतो. संजय राऊत यांनी जो ठाकरे गटाचा एन्काऊंटर केला आणि त्याची सुपारी शरद पवार यांनी दिली होती. तुम्ही तुमचे काम कर जनता ठरवेल कोणाचा एन्काउंटर करायचा, असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला.
दरम्यान, अक्षय शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस ठाण्याकडे आणत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात मोरे गंभीर जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला. कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.