Sanjay Shirsat on Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्रीपदाचा पेच अद्याप सुटलेला नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री अद्याप ठरत नसल्याने महायुतीच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्रीपदावरुन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार टीका केली आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांची खरंच एक चूक झाल्याचे म्हटलं.
महायुतीला बहुमत मिळालेलं असतानाही राज्यात अद्यापही शपथविधी झालेला नाही. त्यावरुन संजय राऊत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दाढीवरून टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी शोभते. तुमची दाढी अफझलखानाची असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर संजय शिरसाट यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदेंनी दाढीवर हात फिरवला तर संजय राऊतांना बाजूच्या डंपिंग ग्राउंडवर बसायला लागेल, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
"अजून एकनाथ शिंदे यांच्या दाढीने खरं रूप तुम्हाला दाखवलं नाहीय. दाढी पार्ट टू येईल तेव्हा तुमची खैर राहणार नाही. सध्या हे सगळं एकनाथ शिंदे ज्या संयमाने घेतायत ते संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. जी काही बडबड संजय राऊत करतात त्यानंतर अनेकांचे आम्हाला फोन येतायत याचे तोंड बंद करा म्हणून. शिंदेंनी दाढीवर हात फिरवला तर संजय राऊतांना बाजूच्या डंपिंग ग्राउंडवर बसायला लागेल. संजय राऊत हे राज्यसभेला फक्त अर्ध्या मताने जिंकले. त्यांना चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदेंच्या दाढीची कल्पना आली आहे. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी राऊत हे एकनाथ शिंदे यांचे पाय धरत होते. तेव्हा एकनाथ शिंदेंनी दाढीवर हात फिरवला असता तर बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसती. एकनाथ शिंदेंची ती चूक झाली," असं संजय शिरसाट म्हणाले.
एकनाथ शिंदे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. महाराष्ट्रात त्यांच्या वाढता प्रभावाला गती द्यायची असेल तर त्यांना राज्यातील राजकारणातच राहावे, अशी माझी इच्छा आहे. कारण राज्याच्या राजकारणात त्यांची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री शिंदे त्यांचा निर्णय ते स्वत: घेतील. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. एकनाथ शिंदे यांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. ते आज किंवा उद्या निर्णय घेतील. राज्यात कोणते पद घ्यायचे हा त्यांचा निर्णय आहे," असंही संजय शिरसाट म्हणाले.