Shiv Sena Shinde Group: आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपविल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता शिवसेनेच्या ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. या ५४ आमदारांना नोटिसीवर उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला आहे. मात्र, आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार नोटिसीला उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून मागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
५४ आमदारांना नोटिसा पाठविल्या असून, न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्या आदेशांचे पालन केले जाईल, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर साधारणतः तीन महिन्यांत अध्यक्षांकडून अपात्रतेसंदर्भात निर्णय घेणे आवश्यक आहे. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून मिळणार असल्याचे म्हटले आहे.
कायदेशीर सल्ला मसलत करण्यासाठी आम्ही मुदतवाढ मागणार
संजय शिरसाट म्हणाले की, ७ जुलै २०२३ रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आम्हाला नोटीसा काढलेल्या आहेत अशी माहिती दिली. तर आता आम्हाला सात दिवसांत नोटिसांना उत्तर देण्यास सांगितले आहे. शुक्रवारी ती काढली सोमवारी ती आम्हाला प्राप्त झाली. कायदेशीर सल्ला मसलत करण्यासाठी आम्ही मुदतवाढ मागणार आहोत, असे संजय शिरसाट म्हणाले. तसेच विधानसभा अध्यक्ष आम्हाला मुदत वाढ देतील, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. काही लोक नोटिसा आल्याने भरपूर काही घडलय असे दाखवत आहेत असे काही झालेले नाही, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी लगावला.
दरम्यान, ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा, यासाठी याचिका दाखल केली आहे. याचा विचार करता याबाबतचा निर्णय १० ऑगस्टपूर्वीच होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.