मुंबई - पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांना अटक केली आहे. रविवारी सकाळी ईडीचे १० अधिकारी राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी पोहचले. यावेळी CISF जवानही सुरक्षेसाठी तैनात होते. सकाळी ७ वाजल्यापासून राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. त्यानंतर दुपारी राऊतांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं गेले. त्यानंतर मध्यरात्री संजय राऊतांना ईडीने अटक केली. याच दरम्यान राऊतांच्या घरी सापडलेल्या पैशांवर एकनाथ शिंदेंचं नाव असल्याच समोर आलं आहे. यावरून आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
संजय शिरसाट यांनी "ईडीच्या लोकांना संजय राऊतांच्या घरी १० ते ११ लाख रुपये सापडले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. राम मंदिराच्या उभारणीसाठी शिंदे यांनी जे पैसे दिले होते, तेही या माणसाने घरी ठेवले की काय?" असं म्हटलं आहे. तसेच "जैसी करनी वैसी भरनी आहे. राऊत लोकांना नावे ठेवत होते. आता त्यांनाच तुरुंगात जावं लागलं आहे. आधीच दोन मंत्री तुरुंगात आहेत. आता हे तिसरे महाशय तिथे पोहोचले आहेत. राऊत तुरुंगात जाऊन दोन मंत्र्यांबरोबर युतीची गप्पा करणार की काय असं वाटतं" असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला.
"राऊतांनी शिवसेनेला फसवलं. उद्धव ठाकरेंना फसवलं आणि बाळसाहेबांना फसवलं. त्यांनी बाळासाहेबांच्या शपथा घेऊन शिवसैनिकांना फसवलं. त्याचं वाईट वाटतं. त्यांनी आपल्या सर्वांचं घर फोडलंय. त्यांच्यापासून सावध राहा असं शिवसैनिकांना आवाहन करतो" असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. राऊतांवर जी कारवाई सुरू आहे ती मागील ४-५ महिन्यांपासून सुरू आहे. त्यांना ईडीने अनेकदा नोटीस पाठवली. काही नोटिसींना ते गैरहजर राहिले. ईडीने कायदेशीर प्रक्रियेतून ही कारवाई केली. संजय राऊतांच्या घरी जे पैसे सापडले ते समजून जा शिंदेंनी दिले. अयोध्याला जाऊन किती महिने झाले? तुम्ही हे पैसे पक्षाला परत करायचे होते? याचा अर्थ राऊतांना ते पैसे ठेवायचे होते असा टोला संजय शिरसाट यांनी राऊतांना लगावला.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, काल ईडीच्या कारवाईवेळी संजय राऊत जे हातवारे करत होते ते अतिशय चुकीचे होते. ईडीची कारवाई सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरही झाली. परंतु अशा अविर्भावात ते वागले नाहीत. संजय राऊतांना त्यांची लायकी आज कळेल. ज्यांच्या नादी लागून संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. त्या कर्माची ही फळे आहेत. संजय राऊत हा त्यांचा प्यादा होता या प्यादाचे काम आता संपलं आहे. शिवसेना फोडण्याचं काम राऊतांनी केले. संजय राऊत शिवसेनेसोबत होते की, राष्ट्रवादीसोबत होते हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती होते असं शिरसाट यांनी सांगितले.