मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे संजयमामा शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विेशेष म्हणजे संजयमामा यांच्यासोबत त्यांचे बंधू माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे देखील उपस्थित होते. शिंदे बंधूंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा संजयमामा यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या.
मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षांना त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. अनेक विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीला हात दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता कोणत्याही नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली की पक्षांतराच्या चर्चांना जोर येतो. त्यातच शिंदे बंधु जोडीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. नुकतीच राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणारे संजयमामा भाजपमध्ये तर जाणार नाही, ना असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना पडला आहे.
दरम्यान सांगली आणि कोल्हापूर येथील पुरग्रस्तांसाठी शिंदे बंधु यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत सुपूर्द केली. त्यासाठीचा धनादेश दोघांनी मुख्यमंत्र्यांना सोपविले. त्यासाठीच या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. संजयमामा यांनी पुरग्रस्तांसाठी ११ लाखांचा धनादेश दिला. तर विठ्ठलराव शिंदे कॉर्पोरेटीव्ह शुगर फॅक्ट्री यांच्या वतीने १० लाख ४ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. परंतु, शिंदे बंधुंनी केलेल्या मदतीपेक्षा त्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीची अधिक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
याआधी अनेक नेत्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत धनादेश देण्यात येत आहेत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील ५० लाखांची मदत करण्यात आली आहे. मात्र शिंदे बंधुची मदतच चर्चेचा विषय ठरली आहे.