लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये दीर्घकाळापासून नादुरुस्त असलेली जवळपास १३ हजार वैद्यकीय उपकरणे गेल्या सहा महिन्यांत दुरुस्त करण्यात आली आहेत. राज्यातील आरोग्य संस्थांमधील एक्सरे मशिन, व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन मशिन, डायलिसिस मशिन अशा उपकरणांचा यात समावेश आहे. वैद्यकीय उपकरणांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी सध्या स्थानिक पातळीवर निविदा मागवून अथवा वार्षिक देखभाल करण्यासाठी निरनिराळ्या संस्थांना करारबद्ध करण्यात येते. मात्र, या प्रक्रियेमध्ये उपकरणांच्या दुरुस्तीसाठी विलंब होत असल्याने त्याचा रुग्णसेवेवर विपरित परिणाम होतो, ही बाब विचारात घेऊन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या उपकरणांच्या दुरुस्तीसाठी एकच संस्था असावी, असे निर्देश विभागाला दिले होते. त्यानुसार राज्यस्तरावरून फेबर सिंदुरी मॅनेजमेंट सर्व्हिसेस या संस्थेची निवड करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य संस्थांमधील सर्व यंत्रसामग्री व उपकरणांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येत आहे. संस्थेच्या परीक्षणानुसार राज्यात एकूण ६८ हजार ९९५ इतकी उपकरणे आहेत. त्यातील महत्त्वाची उपकरणे नादुरुस्त होती. ५0६0 उपकरणांच्या दुरुस्तीसाठी नोंदणी झाली होती, त्यातील ४७३९ एवढी उपकरणे सेवा पुरवठादाराने दुरुस्त केली आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ४३६७, अहमदनगर ३५३६, पुणे ३३०३, तर ठाणे आणि नंदूरबार २००० एवढ्या उपकरणांची दुरुस्ती केली आहे. या उपकरणांना नवसंजीवने मिळाल्याने रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. उपकरणांचे मॅपिंग या उपक्रमांतर्गत आरोग्य संस्थांमधील सर्व बायोमेडिकल उपकरणांचे मॅपिंग केलेले असून त्यांना बारकोड दिले आहेत. त्यामध्ये आरोग्य संस्थेचे नाव, विभागाचे नाव, उपकरणाचे नाव, कार्यान्वित किंवा अकार्यान्वित याबाबतची माहिती भरण्यात येते. यामुळे यंत्र किंवा उपकरण बंद असल्यास, सेवा पुरवठादाराकडे तक्रार दाखल केल्यास त्याला संपूर्ण माहिती मिळते व दुरुस्तीसाठी प्रतिनिधींमार्फत आवश्यक कार्यवाही तत्काळ करता येते..
आरोग्य संस्थांमधील उपकरणांना संजीवनी
By admin | Published: July 16, 2017 1:29 AM