राजेश भिसे/लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेकॉर्ड ब्रेक तुरीच्या उत्पादनामुळे जालना शहरातील दाल मिल्सना संजीवनी मिळाली आहे. ३० पैकी २५ दाल मिल्स सुरू असून, याद्वारे १५०० लोकांना रोजगार मिळाला आहे.जालना शहरात २५ ते ३० वर्षांपूर्वी दाल मिल उद्योग भरभराटीला आला होता. दाल मिलचे शहर म्हणून त्याची ओळख बनली. कालौघात कमी होत गेलेले उत्पादन आणि वाढती स्पर्धा या कारणांमुळे दाल मिल्सचे भवितव्य धोक्यात आले होते. गतवर्षी चांगले पर्जन्यमान झाल्याने, जिल्ह्यात सुमारे २० वर्षांनंतर रेकॉर्ड ब्रेक तुरीचे उत्पादन झाले. त्यामुळे दाल मिल उद्योगाला संजीवनी मिळाली आहे. सततच्या दुष्काळी स्थितीतुळे तीन ते चार वर्षे केवळ १० मिल्स सुरू होत्या. अनेकांचा रोजगार बुडाला होता, पण यंदा तुरीने या उद्योगाला बुस्ट मिळणार असून, २५ दाल मिल्स सद्य:स्थितीत सुरू आहेत.
उद्योगाच्या माध्यमातून मापाडी, हमाल, कामगार आदी मिळून 1500 लोकांना रोजगार मिळाला आहे. राज्य व केंद्र सरकारने दाल मिल उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आणण्याची मागणी या उद्योग क्षेत्रातून होत आहे. नाफेड, तसेच राज्य शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली तूर प्राधान्याने जिल्ह्यातील दाल मिल चालकांनाच द्यावी. या तुरीची परजिल्ह्यात अथवा इतर राज्यांत विक्री करू नये. - अनिल पंच, अध्यक्ष, दाल मिल असोसिएशन, जालना