तिळाच्या दरात घसरण : गृहिणींची लाल तिळाला पसंतीनागपूर : गृहिणींसाठी खुशखबर! लाल आणि पांढऱ्या तिळाच्या दरात घसरण झाल्याने यंदा संक्रांतीत गोडवा वाढला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पादन वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आवक वाढली आहे. केवळ २० दिवसात ठोक बाजारात लाल तिळाचे दर प्रति किलो २१० रुपयांवरून १३५ रुपयांपर्यंत तर पांढरे तीळ १२० ते १२५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. बाजारात होणारी आवक हे मुख्य कारण आहे. दरकपातीमुळे गृहिणींमध्ये उत्साह आहे. उत्पादनात प्रचंड वाढलाल तिळाला काश्मिरी तीळसुद्धा म्हणतात. मकरसंक्रांत सणात महाराष्ट्रीय लोकांमध्ये मुख्यत्वे नागपूर जिल्ह्यात लाल तिळाला प्रचंड मागणी आहे. नागपुरात बहुतांश घरी लाल तिळाचे लाडू तयार होतात. पण गेल्या काही वर्षांत लाल तिळाचे प्रति किलो दर २०० रुपयांवर गेल्याने गृहिणींनी या तिळाकडे कानाडोळा केल्याचे चित्र होते. पण यंदा दरात प्रचंड घसरण झाल्याने बहुतांश घरी चविष्ठ लाल तिळाचे लाडू खायला मिळणार, हे नक्की. तुलनात्मकरीत्या ठोक बाजारात पांढऱ्या तिळाचे दरही प्रति किलो १० ते १५ रुपयांनी कमी होऊन दरपातळी १२० ते १२५ रुपयांवर पोहोचल्याची माहिती बाजाराचे समीक्षक चंदन गोस्वामी यांनी लोकमतशी बोलताना दिली. यंदा लाल तिळाचे उत्पादन गुजरातेत मुख्यत्वे राजकोट, अमरेली, ऊंझा येथे सर्वाधिक झाले. किरकोळ बाजारपेठेचा विचार केल्यास लाल तिळाचे प्रति किलो दर १५० रुपये तर पांढरे तीळ १४० रुपये किलो दराने उपलब्ध असल्याचे गोस्वामी म्हणाले.
संक्रांतीला स्वस्ताईचा गोडवा...
By admin | Published: January 09, 2015 12:53 AM