आळंदी (शेलपिंपळगाव) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळयास शनिवारी (दि.१३) मंदीर परिसराच्या आतमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत व उपरोक्त निर्देशांचे पालन करुन परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिली. कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. यापार्श्वभूमीवर यंदा संत ज्ञानेश्वर माउलींचा पायीवारी सोहळा रद्द करून माऊलींच्या चलपादुका मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीच्या दिवशी पंढरीला जाणार आहेत. मात्र राज्य शासनाच्या सूचनेनुसार आळंदीतील माउलींचे मंदिर ३० जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान आषाढी एकादशीच्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमीला अर्थातच शनिवारी (दि. १३) होत आहे. यापार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळा संपन्न करण्यासाठी किमान पन्नास जणांच्या उपस्थितीतीची परवानगी देवस्थानने प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे मागितली होती. त्यानुसार आज (दि.११) प्रशासनाकडून प्रस्थान सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्थान सोहळ्याची तयारी करण्याचा देवस्थानचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे नियमावलीचे पालन करुन तसेच पालखी सोहळा प्रस्थानावेळी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेल्या सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, स्वच्छता व निर्जंतुकीकरण इत्यादी नियमांचे पालन करुन मंदीर परिसराच्या आतमध्ये परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी आदेशान्वये कळविले आहे.
............................
" शासनाने दिलेल्या नियमावलीत अधीन राहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा संपन्न केला जाणार आहे. प्रस्थान सोहळ्याला मंदिरात प्रवेश दिला जाणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. चालू वर्षी कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन वारकऱ्यांनीही देवस्थानला सहकार्य करावे.'' - अॅड. विकास ढगे - पाटील, प्रमुख विश्वस्त श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी.