आळंदी (शेलपिंपळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीचे स्वरूप बदलून आषाढ शुद्ध दशमीला संतांच्या पादुका हेलिकॉप्टर अथवा बसद्वारे थेट पंढरीत पोचविण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार माऊलींच्या चलपादुका येत्या मंगळवारी (दि.३०) आळंदीतून पंढरपूरला अवघ्या वीस व्यक्तींसोबत शिवनेरी बसद्वारे नेण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानला आज प्राप्त झाले आहे. कडक पोलीस बंदोबस्तात जाणाऱ्या वारीची उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारी म्हणून यंदाचा आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील मानाच्या संतांच्या पादुका पंढरीत नेण्याची जबाबदारी शासनाने घेतली होती. यापार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा जेष्ठ वद्य सप्तमीला तर तीर्थक्षेत्र आळंदीतून जेष्ठ वद्य अष्टमीला माऊलींच्या चलपादुकांचे पन्नास वारकऱ्यांच्या उपस्थित प्रस्थान करण्यात आले. मात्र त्या दिवसापासून संतांच्या पादुका देहू व आळंदीतच मुक्कामी आहेत. यापार्श्वभूमीवर पादुका पंढरीला नेण्यासाठी शासनाकडून शिवनेरी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बसमध्ये फक्त वीस व्यक्तींना पादुकांसोबत जाण्याची परवानगी दिली असून सोबत पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. विशेष म्हणजे पादुकांसोबत साठ वर्षांपेक्षा अधिक वयाची व्यक्ती नसावी. तसेच कोणत्याही स्वरूपाचा आजार नसावा. पादुकासोबत येणाऱ्या व्यक्तींची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. ........................... शिवनेरी बसने होणाऱ्या आषाढी वारीत संतांच्या पादुकांसोबत उपजिल्हाधिकारी अथवा तहसिलदार असणार आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांच्यावर पादुका पंढरपूरला नेण्याची आणि पुन्हा माघारी आळंदीला आणण्याची जबाबदारी देण्यात आली असून आळंदी ते पंढरीच्या प्रवासात पादुका कोठेही थांबणार नाही याचीही दक्षता घेण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.