मुंबई : संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ७४६वा जन्मोत्सव नोव्हेंबरमध्ये पंजाबमधील घुमान येथे भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. या सोहळ्यात नांदेडसह राज्यभरातून हजारो भाविक सहभागी होणार आहेत. तसेच ‘नानक - साई फाउंडेशन’च्या वतीने दरवर्षीप्रमाणे घुमान जन्मोत्सवानिमित्त पंजाब कुरुक्षेत्र दर्शनयात्रा काढण्यात येणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त पहिली संत नामदेव ग्रंथयात्रा नानक-साई फाउंडेशनतर्फे काढण्यात आली होती. मागील वर्षी जन्मोत्सवाला दुसरी यात्रा काढून भक्तांना घुमानसह अमृतसर, वाघा बॉर्डर, चंडीगढ, कुरुक्षेत्र, पानिपत, दिल्ली या ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवण्यात आले होते.यंदा संत नामदेव महाराजांच्या ७४६व्या जन्मोत्सवानिमित तिसरी घुमान - पंजाब दर्शनयात्रा ९ नोव्हेंबर रोजी नांदेड येथून निघणार असून, यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेत नांदेडसह कोल्हापूर, मुंबई, शिर्डी, पाथरी, उस्मानाबाद, निजामाबाद, अकोला, नागपूर, इंदोर, पुणे, नाशिक, लातूर, औरंगाबाद येथील भाविक सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)
संत नामदेवांचा जन्मोत्सव घुमान येथे
By admin | Published: July 04, 2016 5:07 AM