- शहाजी फुरडे-पाटील, वाखरीदेहू येथून विठ्ठल भेटीसाठी निघालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरी येथे विसावला़ विठ्ठल नामाच्या गजराने हा मार्ग दुमदुमून गेला होता़. देहूपासून वाटचाल करीत असलेला सोहळा दररोज किमान वीस किमी अंतर चालावे लागत असल्याने सकाळी सहा ते सात वाजताच पुढील वाटचालीसाठी मार्गस्थ होत असतो़ शनिवारी मात्र पिराचीकुरोली ते वाखरी हे अंतर कमी असल्यामुळे वारकरी निवांतच होते़ वाखरीत हा मुक्काम शेवटचा असून रविवारी पालखी सोहळा पंढरीत प्रवेश करणार आहे़ आता पंढरीच्या हाकेच्या अंतरावर आल्याच्या आनंदाने वारकरी भारावून गेलेले दिसत होते़ गेल्या वीस दिवसांपासून वाटचाल करीत असलेल्या पालखी सोहळ्यादरम्यान यंदा पाऊस पडलाच नाही़ दररोज आभाळ भरुन येत आहे, मात्र पाऊस पडत नाही़ मागील दोन वर्षांपूर्वी रिंगण सोहळ्यादरम्यान पाऊस आला होता, त्यामुळे यंदादेखील तो हजेरी लावेल असे वाटत होते व वारीमध्ये चालत असलेला वारकरी हा विठ्ठल भेटीला आसुसलेला आहे.संत तुकाराम व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांबरोबरच विविध भागातून आलेले बहुतांश सोहळे या मार्गांवरुनच चालत होते़ बाजीराव विहिरीजवळील चौकात सकाळपासून दोन्ही दिंड्यांतील मोकळा समाज व छोट्या-मोठ्या दिंंड्या व पालख्या नामस्मरण करीत या चौकात दाखल होत होत्या़ यामध्ये संत गोरोबाकाका तेर, गुलाबबाबा महाराज, संतनाथ महाराज, चांगावटेश्वर महाराज, शंभू महादेव पालखी सोहळा, संत सोपानकाका, संभाजीबाबा महाराज, संताजी जगनाडे महाराज, सीतारामबाबा थोरात, जनार्धन महाराज वसंतगडकर, निळोबाराय महाराज आदी प्रमुख पालख्यांचा समावेश होता़
संत तुकारामांची पालखी पंढरीजवळ
By admin | Published: July 26, 2015 2:24 AM