Walmik Karad News: दोन कोटी खंडणीच्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला पुण्यावरून केजला आणण्यात आल्यानंतर रात्री साडेदहा वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी दोन कोटींची खंडणी आणि संतोष देशमुख हत्या या दोन्ही प्रकरणे एकमेकांशी संबंधित आहे. हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मीक कराडच्या सांगण्यानुसार काम करतो होता, असे सांगत कोठडीची मागणी केली. तर वाल्मीक कराडच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली.
मागील २०-२१ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला वाल्मीक कराड ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला होता. त्यानंतर सीआयडीने त्याला केजला आणले. त्यानंतर केज येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी १५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण दोन्हींचा संबंध आहे. वाल्मीक कराडने आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
सरकारी वकिलांनी काय केला युक्तिवाद?
सुदर्शन घुले हा वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा. सुदर्शन घुले अद्याप फरार आहे. कॉलवरील आवाज वाल्मीक कराडचा आहे का, हे तपासायचं आहे, असे सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले. सरकारी वकिलांनी एफआरआयमधील मुद्दे कोर्टाला वाचून दाखवले. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले फरार असून, त्यामुळे वाल्मीक कराडची कोठडी महत्त्वाची असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.
सुदर्शन घुलेने काम बंद करण्याची धमकी दिली होती. हातपाय तोडण्याची धमकी सुदर्शन घुलेने दिली होती.
वाल्मीक कराडच्या वकिलांनी काय केला युक्तिवाद?
वाल्मीक कराड हे सामाजिक कार्यकर्ते, गरीब राजकारणी आहेत. खंडणीचा गुन्हा दाखल झाला म्हणून कोठडी मागणे चुकीचे आहे. खंडणी मागितल्याचे फक्त आरोप झाले आहेत. २ कोटींची खंडणी मागितले, मग पैसे दिल्याचे सांगावे. केवळ राजकीय द्वेषापोटी हत्या प्रकरणात वाल्मीक कराडांना गोवण्यात आले आहे. आवाजाचे नमुने देण्यास तयार आहे, पण कोठडी देऊन नका. वाल्मीक कराड शरण आले आहेत त्यांना न्यायालयीन कोठडी द्या, असा युक्तिवाद वाल्मीक कराडच्या वकिलांनी केला.