पुणे : बेदरकारपणे एसटी बस चालवून नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले संतोष माने प्रकरण एसटी महामंडळाला सुमारे १ कोटी ६८ लाख रुपयांना भोवले आहे. या प्रकरणात मृतांचे नातेवाईक, जखमी व काही वाहनचालकांनी नुकसानभरपाई मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. हे सर्व दावे निकाली निघाले असून त्याअंतर्गत ९ टक्के व्याजदराने सुमारे ९८ लाख १३ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.चार वर्षांपूर्वी म्हणजे २५ जानेवारी २०१२ रोजी सकाळी शहरात संतोष माने याने मृत्यूचे थैमान घातले. स्वारगेट एसटी बसस्थानकातील बस पळवून नेत त्याने अनेकांना उडविले. त्यात ९ जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले. तसेच ४० ते ५० वाहनांचे नुकसान झाले. या घटनेला सोमवारी चार वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रकरणात सुरुवातीला एसटीने तातडीची मदत म्हणून मृतांचे नातेवाईक व जखमींना अनुक्रमे ३ लाख व ५० हजार असे एकूण ७० लाख रुपये दिले. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चही एसटीने केला. या घटनेनंतर नुकसानभरपाई मिळण्यासाठी मोटार अपघात न्याय प्राधिकरणात ११ दावे दाखल झाले. या दाव्यांतील शेवटचा निकाल १६ जानेवारीला लागला, तर तीन महिन्यांपूर्वीच पहिला निकाल लागला होता. या सर्व निकालांमध्ये न्यायालयाने एसटीला ९ टक्के व्याजदराने ९८ लाख ६८ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. आधीचे ७० लाख व व्याजासह नुकसानभरपाईची सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांची रक्कम एकत्रित केल्यास हे प्रकरण एसटीला १ कोटी ६८ लाख रुपयांना भोवले.एकूण ११ दाव्यांमध्ये ७ दावे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसदारांनी दाखल केले होते, तर घटनेत जखमी झालेल्या आणि गाडीचे नुकसान झालेल्या व्यक्तीने प्रत्येकी दोन दावे दाखल केले होते. या दाव्यामध्ये एसटी महामंडळाकडे तब्बल ३ कोटी २७ लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. एसटी महामंडळाचे सल्लागार अॅड. अतुल गुंजाळ यांनी अर्ज केल्यानंतर हे सर्व दावे सत्र न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. काही दाव्यातील फुगीर रकमेची मागणी अमान्य करीत न्यायालयाने ९८ लाख १३ हजार ८०० रुपयांची नुकसानभरपाई दावा दाखल केलेल्या तारखेपासून ८ टक्के व्याजाने देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
संतोष माने प्रकरण एसटीला भोवले
By admin | Published: January 25, 2016 1:03 AM