नवी मुंबई : गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने सराईत सोनसाखळी चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल झाली असून चोरीचा तीन लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.पनवेल व लगतच्या परिसरात सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. यानुसार उपआयुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या पथकाने सापळा रचला होता. पनवेल परिसरात रचलेल्या या सापळ्यामध्ये शत्रुघ्न भोपी हा सराईत गुन्हेगार त्यांच्या हाती लागला. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले असता त्याने साथीदारांसह परिसरात अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यापैकी ५ गुन्ह्यांची उकल झाली असून पनवेल, खारघर, खांदेश्वर परिसरातील हे गुन्हे आहेत. या गुन्ह्यांमधील २ लाख १७ हजार रुपये किमतीचे चोरीचे दागिने व गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
सराईत सोनसाखळी चोराला अटक
By admin | Published: May 21, 2016 2:27 AM