पाण्याचा भरलेला ग्लास...हाती येतो...काही वेळा अवघा एक घोट घेऊन आपण तो तसाच सोडून देतो...काही सेकंदात हे सारं घडतं...बादलीभर पाणी...हंडाभर पाणी...तेही आपण काही सेकंदात फेकून देतो...मात्र त्याच बादलीभर...हंडाभर पाण्यासाठी काहींचा दिवसच नाही तर रात्रही जात असते...घोटभर पाणी मुखी लागावं यासाठी काहींना जीवाचा धोकाही पत्करावा लागतो...उगाचच काही तरी सनसनाटी सांगून तुम्हाला आम्ही खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करीत नाही आहोत...हे सारं घडतंय...ते आपल्या राजधानी मुंबईतील मंत्रालयापासून अवघ्या ऐंशी किलोमीटरवर.... मंत्रालयातून दावे काहीही केले जावोत...पण हे भीषण वास्तव आहे...
हे वास्तव केवळ एका गावापुरते मर्यादित नाहीय...लोकमत न्यूज नेटवर्कचे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता यांनी दिल्लीतून मिळवलेली आकडेवारी महाराष्ट्रातील पाणीबाणीची व्यापकता आणि गंभीरताही स्पष्ट करतेय...
महाराष्ट्रात पाणीबाणी
- महाराष्ट्रातील गावांची एकूण संख्या - ४३, ६६५
- पाणीटंचाईग्रस्त अर्ध्याहून जास्त – अंदाजे २२,०००+
- पाणीटंचाईग्रस्त खेडी २६, ३४१
- पाणीटंचाईग्रस्त वस्त्या १२, ९५६
अर्ध्याहून जास्त महाराष्ट्राला ग्रासणाऱ्या पाणीबाणीचा वेध सातत्याने घेत www.lokmat.com सरळ-स्पष्ट वास्तव जसं आहे तसं मांडणार आहे...तुम्हाला वाटेल एसीमधून बाता मारल्या जातायत का...तर तसं नाही...हे जिथं आहे तिथं थेट जाऊन घेतलेला वेध...जमिनीवरचं दाहक वास्तव...स्वत: अनुभवून मांडलेलं...
मुंबईपासून अवघ्या ऐंशी किलोमीटर अंतरावर...पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका...ओंदे गावातील...जनाठे पाडा...पाणीबाणी असलेल्या महाराष्ट्रातील तेरा हजार वस्त्यांपैकी एक...तळपत्या उन्हात मी तेथे पोहचलो तेव्हा एवढं भीषण वास्तव पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं...
गावकरी पाणी कुठून भरतात असं विचारलं तेव्हा दूरवर बोट दाखवण्यात आलं...तेथे निघालो...रस्त्यात एक महिला तिच्या मुलांसह पाणी भरायला जाताना दिसली...तिच्याच मागे गेलो...विहिर आली...अरे पण हे काय...विहिरीत पाणी आहे तरी कुठे...तिनेच दाखवले...खोल खोल पाणी...म्हणजे तळाशी खडकांमध्ये साचलेलं डबक्यासारखं....
पाणी मिळवण्यासाठी दिवस रात्र झगडावं लागतं...ठेचाळत...धडपडत...अगदी जीव धोक्यात टाकावा लागतो...पाणी म्हणजे जीवन...जीवनासाठीच जीवन धोक्यात...
जे आधी आले त्यांना किमान तेव्हढं तरी पाणी मिळालं...काहींना तसंच परतावं...लागलं....त्यांच्याकडेही पाणी होतं...पण भांड्यात नाही...तर डोळ्यात...गच्च भरलेलं!
पालघर हा जिल्हा मुंबई-ठाणे परिसराला पाणी पुरवणारा जिल्हा...त्या जिल्ह्यातील पाणीबाणीबद्दल पालकमंत्री विष्णु सावरा हे सरकारी यंत्रणेची पाठ थोपटताना दिसतात. गेल्या वर्षापेक्षा आता टँकर कमी झाले. तरीही कुठे पाणी कमी पडू देणार नाही, यंत्रणेला तसं सांगितल्याचाही दावा करतात. पण ते सांगताना आपल्याच विक्रमगड मतदारसंघातील ओंदे ग्रामपंचायतीच्या हद्दीत जनाठेपाडा ही वस्ती आहे. त्या वस्तीत पाण्यासाठी गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालावा लागतोय हे त्यांच्या गावीही नसावे!
मंत्रालयातील कागदावरील माहिती बिनदिक्कत मांडणारे आपले मंत्री कधी हे समजून घेतील की त्यामुळे ते भ्रामक वास्तव तयार करु शकतील...पण त्यांचं हे कागदावरचं पाणी सामान्यांची तहान कशी भागवणार?