पुणे/ कोल्हापूर/ मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर सारंग अकोलकर आणि त्याच्या एका सहकाऱ्यानेच गोळ्या झाडल्याचा दाट संशय सीबीआयला आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीआयचे अधिकारी दाभोलकर हत्या प्रकरणाचा सूत्रधार डॉ. वीरेंद्र तावडे याच्याकडून सखोल माहिती घेत आहेत. सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे यांच्यात झालेल्या ई-मेलमध्ये ७ जणांचा उल्लेख असून, त्यांचाही शोध घेण्यात येत आहे़ मडगाव बॉम्बस्फोटानंतर अकोलकर हा फरारी असून, त्याचा शोध एनआयएपासून सर्व एजन्सी घेत आहेत़ दरम्यान, तावडे हा सीबीआयला तपासासाठी मदत करीत नसल्याने त्याची न्यायालयाच्या परवानगीने बे्रनमॅपिंग आणि पॉलिग्रॉफ टेस्ट घेण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.ओंकारेश्वर मंदिराजवळ २० आॅगस्ट २०१३ रोजी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोघा मारेकऱ्यांनी डॉ. दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर जवळपास पावणेतीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने पहिली अटक केली. अकोलकर आणि तावडे यांच्यामध्ये २०० हून अधिक ई-मेलची देवाण-घेवाण झाली होती. या पार्श्वभूमीवर आणि तपास यंत्रणांकडे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सारंग अकोलकरच असावा, असा दाट संशय सीबीआयला आहे. दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार तावडे असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासावरून स्पष्ट झाले आहे़ अकोलकरबाबत सीबीआयला माहिती देण्यास तावडे टाळाटाळ करीत आहे. या हत्याकाडांमागे आणखी काही जण असण्याची दाट शक्यता आहे. सनातन संस्थेवर बंदीची शिफारसकेंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणीच्या आपल्या अंतिम अहवालात महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांनी सनातन संस्थेवर सरसकट बंदी घालावी, अशी शिफारस करणार असल्याचे समजते. महाराष्ट्र सरकारला यापूर्वी दहशतवाद प्रतिबंधक पथकाकडूनही (एटीएस) दोन वेळा अशाच शिफारशी प्राप्त झाल्या होत्या. शिवाय, विजय नामदेव रोकडे यांनी २०११ साली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ही याचिका आज हायकोर्टाच्या बोर्डावर होती. मात्र, वकिलाच्या अनुपस्थितीमुळे त्यावर आज सुनावणी झाली नाही.तपास यंत्रणांचा संशय बळावला : तावडेकडे काळ्या रंगाची होंडा मोटारसायकल असून, त्याच मोटारसायकलचा वापर संशयितांनी दाभोलकर हत्याप्रकरणात केला आहे काय, याचा तपास सीबीआय करीत आहे. तावडेची १ जून ते १० जूनदरम्यान कसून चौकशी करण्यात आली. त्या चौकशीमध्ये त्याने दिलेली माहिती आणि सीबीआयकडे उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये कमालीची तफावत आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचा संशय आणखी बळावला आहे.पानसरेंच्या हत्येचा ‘मास्टर माइंड’ तावडे?डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ‘सीबीआय’ने अटक केलेला हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील ‘मास्टर माइंड’ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यासंबंधी काही महत्त्वाचे पुरावे हाती आले आहेत. डॉ. तावडेचा ताबा मिळण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्याकडे मंगळवारी अर्ज सादर केला. त्यास न्यायालयाने तत्काळ मंजुरी दिली. - सीबीआयने सोमवारी सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमातून एका संगणकाची हार्ड डिस्क जप्त केली असून, त्यातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सारंग अकोलकरच मारेकरी
By admin | Published: June 15, 2016 5:36 AM