नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, रमाबाई आंबेडकर, फातिमा शेख या सहा कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमापूजनाने करण्याचे नियोजन केले जात असल्याचे समजते. मात्र, सरस्वतीला विद्येची देवता मानले जात असल्याने तिच्या पुत्रांचा म्हणून जो सारस्वतांचा मेळा भरवला जातो, त्या साहित्य संमेलनात सरस्वतीपूजनासह दीपप्रज्वलनाच्या परंपरेचे पालन होणार का? त्याबाबत स्पष्टपणे सांगण्यास निमंत्रकांनी नकार दिला आहे.
कोणत्याही सांस्कृतिक, साहित्यिक मेळावा तसेच साहित्य संमेलनाचे उद्घाटन सरस्वती पूजनाने करण्याची आजवरची प्रथा, परंपरा आहे. मात्र, नाशकात होऊ घातलेल्या ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सहा कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमापूजनाने होणार आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनात सरस्वतीपूजनाला फाटा दिला जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
साहित्य संमेलन अथवा कोणत्याही कार्याचा शुभारंभ देवदेवतांच्या पूजनाने होतो. त्याचप्रमाणे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सरस्वतीपूजनाने करण्याची आजवरची परंपरा आहे. नाशकात होऊ घातलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ३ डिसेंबर रोजी होणार असून, त्यादृष्टीने तयारीला वेग आला आहे. विविध समित्यांच्या बैठका, नियोजनाची धावपळ आणि उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असतानाच दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन होणार की नाही? अशी चर्चा सुरू झाल्याने संमेलनात मतभेदाची दरी निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे साहित्य वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.
वादात पडणार भरसाहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेतील कार्यक्रमांमध्ये केलेले बदल, संमेलनात राजकारण्यांचा व्यासपीठावर सहभाग तसेच सभामंडपासह व्यासपीठाला सावरकर यांचे नाव देण्याबाबतच्या मागणीवर चाललेली टाळाटाळ, यासह विविध भूमिकांवरून वाद सुरू असतानाच सरस्वती प्रतिमापूजन होणार की नाही? दीपप्रज्वलनाला फाटा दिला जाणार का? अशा चर्चांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संमेलनात सरस्वतीपूजन करायचे किंवा कसे याबाबत स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी विचारविनिमय करून उद्या निर्णय घेतला जाणार आहे. तसेच डॉ. नारळीकर हे संमेलनाध्यक्ष वैज्ञानिक असल्याने दीपप्रज्वलन करायचे किंवा कसे? याबाबत संमेेलनाध्यक्षांना विचारून निर्णय घेण्यास सांगितले असल्याने संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. - जयप्रकाश जातेगावकर, निमंत्रक