मुंबई : राज्यातला सैराट सरकारचा झिंगाट कारभार सुरू आहे. त्यामुळे जनतेलाच याड लागायची पाळी आली आहे. आता राज्यपालांनीच दिग्दर्शकाच्या भूमिकेत जाऊन या चित्रपटाचे ‘पॅकअप’ करायची वेळ आली आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी राज्य सरकारवर टीका केली. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत चहापानावर बहिष्कार टाकला. पावसाळी अधिवेशनासंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, लोकभारती आदी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक झाली. यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्र्यांचा भ्रष्टाचार, मंत्रिमंडळातील विसंवाद, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांबाबत सरकारी अनास्था, डाळ घोटाळा आणि महागाईच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील फडणवीस सरकार ट्विटरवर चालते आहे. मंत्री व मुख्यमंत्र्यांमधील विसंवाद ही चिंतेची बाब आहे. भाजपाचेच लोक मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळू लागले आहेत. हा सारा प्रकार अनाकलनीय असून राज्याच्या स्थापनेपासून अशी परिस्थिती कधीच बघितली नव्हती, असे विखे-पाटील म्हणाले. अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात घोटाळेबाज मंत्र्यांचा समावेश केला आहे. हे मंत्रिमंडळ अनैतिकतेच्या पायावर उभे असून अशा भ्रष्ट मंत्र्यांसोबत कसे काम करावे, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व भ्रष्ट मंत्र्यांना तातडीने बरखास्त करावे, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. भ्रष्ट अधिका-यांना पाठीशी घालायचे आणि स्वच्छ कारभार करणा-यांची बदली करण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले आहे. नोकरदारांच्या माध्यमातून राज्य चालविले जात आहे. त्यामुळे सरकारचे अस्तित्व कोठेही जाणवत नसल्याची टीका विखे-पाटील यांनी केली. राज्यातील सत्तांतरानंतर पाच अधिवेशने झाली. यात जनतेच्या हाती काही लागले नाही. या सरकारच्या काळात ४ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. तीव्र दुष्काळानंतर आता पाऊस पडतोय. परंतु बी-बियाणे, खते घ्यायला पैसे नाहीत म्हणून जून महिन्यातही शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत. तर, दुसरीकडे भाजपा पुरस्कृत सावकारांची मुजोरी वाढली आहे. शेतक-यांना जबरदस्तीने विष पाजण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. केंद्रातील सरकारने मोठा गाजावाजा करीत शेतकरी फसल पीक विमा योजना आणली. पण, राज्यातील १४ जिल्ह्याला विमा कंपनीच भेटली नाही. सरकारी अनास्थेमुळे शेतकरी देशोधडीला लागल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली. दाळ घोटाळा प्रकरणी लोकायुक्तांनीच मंत्र्यांना फटकारले आहे. केंद्राकडून ६६ रुपयात घेतलेली दाळ १२० रुपयांनी विकली जात आहे. मधले ५४ रुपये कोठे जातात, याचे उत्तर अधिवेशनात द्यावेच लागेल. जप्त केलेली दाळ गेली कुठ, असा सवाल मुंडे यांनी केला. (प्रतिनिधी)>‘इज आॅफ डुइंग करप्शन’ अन् ‘एक्सप्लॉयटेशन’च!मुख्यमंत्री सातत्याने ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’च्या गप्पा करतात. प्रत्यक्षात मात्र ‘इज आॅफ डुइंग करप्शन’, ‘इज आॅफ डुइंग एक्सप्लॉयटेशन’च सुरू आहे, असे विखे-पाटील म्हणाले. काँग्रेस कार्यालयात सोमवारी मंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या प्रदर्शनास मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व मंत्र्यांसह भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.>खडसेंबाबतचा निर्णय पुण्याच्या चौकशीनंतर३० कोटींच्या लाच प्रकरणातील आरोपपत्रात एकनाथ खडसे यांचे नाव नसल्याने आता त्यांना मंत्रिमंडळात परत घेणार का, या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही. मात्र भोसरी, पुणे येथील एमआयडीसीच्या जमीन प्रकरणाविषयी अहवाल आल्यानंतर त्यांना परत घ्यायचे की नाही, याबाबत निर्णय घेऊ.
‘सैराट’ सरकार, ‘झिंगाट’ कारभार - विरोधक
By admin | Published: July 18, 2016 5:14 AM