सारथी! दोन तासात 8 कोटींचा निधी, हीच समाजाची ताकद; संभाजीराजेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 10:03 PM2020-07-09T22:03:22+5:302020-07-09T22:05:29+5:30
सारथीबद्दलच्या मराठा समाजाच्या मागण्या समन्वयक समितीच्या बैठकीत ऐकून घेतल्या. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी माझ्या दालनात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत दुसरी बैठक घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
मुंबई : सारथी संस्था बंद केली जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. यावर आज मंत्रालयात छत्रपती संभाजीराजेंसोबत बैठक झाली. याबैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथीला 8 कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले आणि तातडीने आदेशही काढला. यावर संभाजीराजेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सारथी! दोन तासात 8 कोटी रुपयाचा निधी मिळवता आला . सर्व मागण्या मान्य करून घेता आल्या. ही समाजाची ताकद आहे. हा मराठा समाजाचा विजय आहे. समाजात एकी असली की सर्व काही करून घेता येतं. स्वायत्त आणि सक्षम सारथी गरीब मराठा समाजातील गुणवंत युवकांच्या जीवनात क्रांती घडवेल. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने उभारलेली ही संस्था सर्वार्थाने लोक कल्याणकारी ठरेल असा विश्वास आहे, असे मत संभाजीराजेंनी व्यक्त केले.
सारथी! दोन तासात 8 कोटी रुपयाचा निधी मिळवता आला . सर्व मागण्या मान्य करून घेता आल्या. ही समाजाची ताकद आहे. हा मराठा...
Posted by Yuvraj Sambhajiraje Chhatrapati on Thursday, 9 July 2020
सारथी संस्थेला भरीव आर्थिक मदत मिळावी आणि संस्थेची स्वायत्तता कायम राहावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती. त्या संदर्भात आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. सारथी संस्था आता नियोजन विभागाच्या अखत्यारित येईल. तिचा कारभार पारदर्शक असेल, अशी मला आशा आहे, असं अजित पवार म्हणाले. सारथी संस्थेच्या समोर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी जातीनं लक्ष घालेन, असं आश्वासन त्यांनी दिलं.
दोन बैठकांचे वेगळे अर्थ काढू नका...
सारथीबद्दलच्या मराठा समाजाच्या मागण्या समन्वयक समितीच्या बैठकीत ऐकून घेतल्या. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी माझ्या दालनात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत दुसरी बैठक घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. या दोन बैठकांचे समाज बांधवांनी वेगळे अर्थ काढू नयेत, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं. अजित पवार यांना आजच्या आज निर्णय घ्यायचा असल्यानं त्यांनी मला त्यांच्या दालनात बैठकीसाठी बोलावलं होतं, असं संभाजीराजे म्हणाले.