ओतूर : दोन सराईत मोटारसायकलचोरांना जुन्नर तालुका व इतर ठिकाणांहून एकूण २१ मोटारसायकली चोरल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. सर्व (२१) मोटारसायकली ओतूर पोलीस ठाणे हद्दीतील विविध गावांत व स्वस्तात विकल्याची कबुली या सराईत चोरांनी दिल्यामुळे या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या सराईत मोटारसायकल चोरांची नावे भाऊराव पांडुरंग गांडाळ, दगडू बस्तीराम गांडाळ (रा. सावरचोळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी आहेत.या आरोपींनी डिंगोरे, सांगनोरे, मांडवे आदी गावांतून जुन्नर व नारायणगाव शहरातून गाड्या चोरल्याचे व त्या चोरीच्या गाड्या प्रत्येकी ५ हजार रुपयात विकल्याची कबुली दिली. जुन्नरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई व ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी ही माहिती संयुक्तपणे दिली.ओतूर (ता. जुन्नर) पोलीस ठाण्याच्या वतीने गुन्हा रजि. नं. १५/२०१६ भा.दं.वि. कलम ३७९ या गुन्ह्याचा तपास करताना ओतूर पोलीस स्टेशन भाग ५ गुन्हा रजि. नं. १५/२०१६ ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली.काही तरुणांनी ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील डिंगोरे, सांगनोरे, मांडवे व तसेच अकोले तालुक्यातील काही गावांतून मोटारसायकली चोरल्या व त्या विकल्याचीही माहिती होती.त्यानंतर भलेवाडी (ता. जुन्नर) येथील एका मोटारसायकल चालकास मोटारसायकल थांबवून त्याच्याकडे कागदपत्रे मागितली; परंतु त्याच्याकडे गाडीची कागदपत्रे नव्हती. तेव्हा अधिक चौकशी केली असता त्याने गाडी कोणाकडून खरेदी केली ते सांगितले.ओतूर पोलिसांनी मोटारसायकलींची कागदपत्रे मिळविली. या आरोपींकडून ज्यांनी ज्यांनी गाड्या विकत घेतल्या होत्या, त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर याबद्दल माहिती दिली.या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे गट तपास करीत असताना या आरोपींना घरी जाऊन ताब्यात घेतले. एकूण २१ गाड्या या आरोपींनी चोरल्या होत्या. त्या सर्व ओतूर पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. त्या सर्व ओतूर पोलीस ठाण्यात जमा आहेत.देसाई व थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बी. आर. बाडीवाले, अर्चना दयाळ, शरद लोखंडे, पोपट मोहोरे, नीलकंठ कारखेले, प्रल्हाद आव्हाड, मुकुंद मोरे, दत्तात्रय जठर, ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस मित्र विजय ताजणे यांचा कारवाईत समावेश होता.
सराईत मोटारसायकलचोरांना अटक
By admin | Published: April 27, 2016 1:33 AM