यदु जोशी, मुंबईराष्ट्रवादी काँग्रेस हा सरदारांचा एकत्रित संघ असल्याची टीका नेहमीच केली जाते. या पक्षाच्या नेत्यांमध्ये टगेगिरी वाढल्याची टीका विरोधक करीत होते. राष्ट्रवादीची प्रतिमा ज्या नेत्यांमुळे बरीवाईट तयार झाली, त्यातील बरेच जण निवडून आले. पक्षाची अब्रू राखण्यासाठी हे सरदारच कामी आले. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, आर. आर. पाटील, मनोहर नाईक, जयदत्त क्षीरसागर, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, भास्कर जाधव असे दिग्गज जिंकले. गणेश नाईक, अनिल देशमुख, सचिन अहीर, नवाब मलिक, सुरेश धस यांना मात्र पराभवाचा धक्का बसला. काका-पुतण्यापासून बारामती मुक्त करा, असे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला मतदारांनी किंमत दिली नाही. पुणे, बीड, सोलापूर, जळगाव जिल्ह्यामध्ये जबर फटका बसला. पुणे जिल्ह्यात गेल्यावेळी २१ पैकी १० आमदार होते. या वेळी हा आकडा तीनवर आला. पुणे म्हणजे पवार या समीकरणाला जबर धक्का बसला. विदर्भात आता घड्याळात मनोहर नाईक हा एकच काटा उरला. युती-आघाडी झाली असती तर मोठा फटका राष्ट्रवादीला बसला असता. चौघेही वेगवेगळे लढल्याने राष्ट्रवादीच्या प्रस्थापितांना मतविभाजनाचा फायदा होऊन ते निवडून येऊ शकल्याचे किमान १५ ते १८ ठिकाणी दिसते.
सरदारांनीच राखली राष्ट्रवादीची अब्रू
By admin | Published: October 20, 2014 5:25 AM