ऐतवडे बुद्रुक : प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो, या म्हणीला छेद देत, स्त्रीच्या यशामागे पुरुषाचाही हात असू शकतो, या म्हणीचा प्रत्यय डोंगरवाडी (ता. वाळवा) येथील सौ. सारिका उत्तम पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मंत्रालय सहायक पदासाठी त्यांनी राज्यातून खुल्या प्रवर्गातील मुलींतून द्वितीय क्रमांक पटकाविला. या यशामागचे खरे हक्कदार म्हणून त्यांनी पती उत्तम पाटील यांना मान दिला आहे.येथील सौ. सारिका पाटील यांची मंत्रालय सहायक पदासाठी निवड झाली आहे. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव सारिका एकनाथ खोत. माहेर मरळनाथपूर. त्यांचा सहा वर्षांपूर्वी डोंगरवाडी येथील उत्तम पाटील यांच्याशी विवाह झाला. त्यावेळी त्यांनी बी. ए.पर्यंत शिक्षण घेतले होते. सारिका पाटील यांनी आयोगाच्या आजपर्यंत चार वेळा परीक्षा दिल्या. दरवेळी अपयश पदरी पडत होते. पण न डगमगता त्यांनी परिश्रम व अभ्यास सुरूच ठेवला. चुलत सासरे रंगराव पाटील व तानाजी पाटील यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. बेताची परिस्थिती, विवाहित महिला, लहानशा खेडेगावात वास्तव्य, असे असतानाही त्यांनी उत्तुंग यश संपादन केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)पती आणि सासरच्या मंडळींची साथलग्नानंतर खेडेगावातील मुली संसारातच रमतात. परंतु सारिकाची हुशारी, अभ्यास करण्याची सुप्त इच्छा व कष्ट करण्याची तयारी पाहून पती उत्तम यांनी त्यांना एम.ए.चे शिक्षण पूर्ण करण्याची मुभा दिली. त्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रेरणा दिली. एम.ए.नंतर कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठे अधिकारी व्हायचेच, हेच स्वप्न पतीने सारिका यांना दिले. स्वत: सारिका व पती उत्तम यांनी यासाठी खूप कष्ट घेतले. घरात लहान मुलगा असतानाही ओढाताण करून अभ्यासासाठी एक वर्ष इस्लामपूर येथे वास्तव्य केले. यावेळी पती उत्तम यांनी लहान बाळाला सांभाळले. पतीसह सासूनेही घरकाम व मुलाचे संगोपन केले.
डोंगरवाडीच्या सारिका पाटील यांची मंत्रालय सहायकपदी निवड
By admin | Published: June 26, 2015 11:10 PM