नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा करायची असेल तर सामान्यत: संघ मुख्यालयातच त्यांची भेट घ्यावी लागते. परंतु शनिवारी रात्री सरसंघचालकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. गडकरी यांना काम करू दिले जात नसल्याचे वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी नुकतेच केले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीबद्दल विविध कयास लावले जात आहेत. शनिवारी रात्री ९च्या सुमारास गडकरी यांच्या महाल येथील वाड्यावर सरसंघचालक पोहोचले. गडकरी काही दिवसांपूर्वीच आजोबा झाले आहेत. याबद्दल सर्वात प्रथम त्यांनी गडकरी यांच्यासह कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या व नातीची ख्यालीखुशाली विचारली. त्यानंतर दोघांमध्ये सुमारे पाऊण तास बंदद्वार चर्चा झाली.एकूण सुमारे दीड तास डॉ. भागवत हे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी होते. या भेटीत नेमकी कुठल्या मुद्यांवर चर्चा झाली हे कळू शकले नसले तरी भाजपातील अंतर्गत राजकारण, व्यापमं घोटाळा, ललित मोदी प्रकरण व पंजाबमधील दहशतवादी हल्ला याबाबतीत विरोधकांकडून घेण्यात आलेली आक्रमक भूमिका या पार्श्वभूमीवर उभयतांच्या भेटीला महत्त्व आले आहे. याबाबत संघ परिवाराकडून मौन साधण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सरसंघचालक गडकरीवाड्यावर !
By admin | Published: August 03, 2015 1:29 AM