अकोला: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत १३ डिसेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. इयत्ता दहावीसाठी झालेल्या राज्यस्तरीय चाचणी परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले असून स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेचा सार्थक धनंजय ठाकरे याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे, त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करणे. या हेतूने दहावीतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते.
या परीक्षेत अकोला जिल्ह्यातुन खुला प्रवर्गातून १६ विद्यार्थी, ओबीसी प्रवर्गातून ४ विद्यार्थी, एससी प्रवर्गातून ५ विद्यार्थी तर एसटी प्रवर्गातून २ अशा एकूण २७ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परीक्षेसाठी निवड झाली आहे. परीक्षेत आदित्य अर्जुन जुनगडे, श्रीराज सुरेंद्र काळबांडे, अजिंक्य नरेंद्र धर्मे, दक्ष यशवंत सावके, सिद्धांत वसंत पस्तापुरे, प्रणव गजानन झोपे, तनिष्क महेश मानधने, हर्षवर्धन राजेश खुमकर, साक्षी नरेंद्र कराळे, रिषभ संदीप अग्रवाल, मकरंद मिलिंद रेळे, पराग महादेव चिमणकर, विघ्नेश मनोज सांगळे, परिमल राजेश तिंगाने, मिहिर दिवाकर टाले, नमस्वी नारायण शेगोकार, विनित अशोक गोल्डे, यश राजेश गट्टुवार, ओजस सुनील सोळंके, शुभम दिनेश गाढे, मृणाल संदी, सानिका प्रेमकुमार गावनार, निधी राजु सरदार, प्रियांशु लक्ष्मण सिरसाट, दिप्ती गजानन ढाकरे, वेदांत गोपीचंद गजभिये आदी विद्यार्थ्यांनी एनटीएस परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. या विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप तायडे, एनटीएस परीक्षेचे संयोजक प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, समन्वयक शशीकांत बांगर यांनी कौतुक केले.
आता राष्ट्रीय परीक्षेसाठी तयारी
राज्यस्तरीय फेरीची परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात आली. त्याचा निकाल सोमवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. लेवल-१ मध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी केंद्रीय स्तरावर होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. राष्ट्रीयस्तर एनटीएसई परीक्षा एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. संबंधित निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
युट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळावे. या उद्देशाने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समितीमार्फत विद्यार्थ्यांना एनटीएस, एनएमएमएस व स्कॉलरशिप परीक्षेचे मार्गदर्शन दर रविवारी यूट्यूबच्या माध्यमातून करण्यात येत आहे. एनटीएसईमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यापासून परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे संयोजक डॉ. रविंद्र भास्कर यांनी सांगितले.