नाशिक : मार्च महिन्यात नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या चर्चेने आता जोर पकडला आहे. साहित्यिक वर्तुळात सध्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचे नाव आघाडीवर असून, कृतिशील लेखक अनिल अवचट यांच्या नावाच्या चर्चेलादेखील बहर आलेला आहे. अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय २४ जानेवारीलाच जाहीर केला जाणार आहे. त्याआधी १९ जानेवारीपर्यंत साहित्य महामंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयांमधून अग्रणी साहित्यिकांची नावे पाठवली जाणार आहेत. त्यानंतर २३ जानेवारीला सर्व विभागीय प्रतिनिधी आणि महामंडळाच्या अध्यक्षांच्या बैठकीत चर्चा आणि विचारविनिमय करुन निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अधिकृत घोषणेसाठी अजून आठवडाभरापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे.१९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. नवकथेची सारी वैशिष्ट्ये त्यांनी आत्मसात केली आहेत.
अनिल अवचट यांनाही वाढता प्रतिसाद -साहित्यिक अनिल अवचट यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळेच त्यांच्या नावाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. १९६९मध्ये त्यांनी ‘पूर्णिया’ हे पहिले पुस्तक प्रसिद्ध केले, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले. आतापर्यंत त्यांची २२ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे.ते पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत. डॉ. अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे.
शोभणे, शहाणे, भवाळकर, नारळीकर यांचीही चर्चा -रवींद्र शोभणे, जयंत नारळीकर यांच्या नावांचीही चर्चा आहे. तर नाशिकचे आजोळ असलेल्या तारा भवाळकर आणि नाशिक हीच कर्मभूमी असलेल्या मनोहर शहाणे यांची नावेदेखील चर्चेत आहेत.