पंकज रोडेकर,
ठाणे- शहर पोलीस दलातील बॉबी या श्वानाच्या अकालीन निधनानंतर रिक्त जागी ‘साशा’ या हिने घेतली आहे. ९ महिन्याचे प्रशिक्षण घेवून ती शहर पोलीस दलात रूजू झाली आहे. ‘नीळ’ या श्वानाबरोबर तिची घरफोडी,दरोडा आणि खून या सारखे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तिची पोलिसांना मदत होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.पोलीस दलात बॉम्ब शोधक नाशक, गुन्हे शाखा शोधक श्वान आणि अमंली विरोधी श्वान अशी तीन पथके कार्यरत आहेत. त्यातील ठाणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा शोधक श्वान पथकासाठी श्वानाची दोन पदे मंजूर आहेत. याच पथकातील ‘बॉबी’ या श्वानाचे एप्रिल २०१५ मध्ये अकालीन निधन झाले. त्यामुळे सर्व जबाबदारी त्याचा सहकारी ‘नीळ’वर येऊ ठेपली. तो ही सध्या ५ वर्षाच्या आहे. याचदरम्यान, ठाणे पोलिसांनी डाबरमॅन जातीमधील ५ महिन्याची मादी विकत घेतली. तिच्या विकत घेण्याची कायदेशीररित्या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिला ९ महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पुणे, शिवाजीनगर येथे पाठविण्यात आले. तिला चौवीस तास हाताळण्यासाठी असलेल्या दोन प्रशिक्षित पोलीस शिपायांची तिच्यासोबत रवानगी केली होती. ९ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सोमवारी साशा ही ठाण्यात आली. यावेळी तिने शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सह-पोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांच्यासह गुन्हे शाखेतील अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपली वर्दी दिली. त्यानंतर ती मंगळवारपासून पोलीस दलात खऱ्याअर्थाने रूजू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.