दापोली (रत्नागिरी) - आंबेनळी घाटातील बस अपघातात बचावलेले एकमेव कर्मचारी प्रकाश सावंत-देसाई यांच्याबाबतचा मृतांच्या नातेवाईकांच्या मनातील संशय अजूनही कमी झालेला नाही. या अपघाताला एक महिना पूर्ण झाला तरी सावंत-देसाई यांच्याबाबत कोणतीच कारवाई न झाल्याने या अपघातातील मृतांचे नातेवाईक बुधवारी कोकण कृषी विद्यापीठात घुसले. या अपघातात एकट्या बचावलेल्या प्रकाश सांवत-देसाईला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी यावेळी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. जर यात ते दोषी निघाले तर त्यांना कामावरून बडतर्फ करा असंही मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.
२८ जुलैच्या सकाळी साडे १० च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३० जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत प्रकाश सावंत देसाई वाचले. त्यावरुन मृतांच्या नातेवाईकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
मृतांच्या नातेवाईकांनी उपस्थित केलेले प्रश्न- बसमधील ३3 जणांपैकी एकटे प्रकाश सावंत देसाईच कसे काय वाचले?- ते नेमके कुठे बसले होते?- ते एकटेच कसे काय बसच्या बाहेर फेकले गेले?- शेवाळं लागलेल्या कातळावरुन प्रकाश सावंत देसाई कसे काय वर आले?- प्रकाश सावंत यांनी पोलिसांसह प्रसार माध्यमांना वेगवेगळी उत्तर का दिली?