पोलादपूर : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटातील दाभीळ टोकाजवळ दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीमध्य कोसळून झालेल्या अपघातामुळे आंबेनळी घाट पुन्हा चर्चेत आला आहे. या अपघाताच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने २० एप्रिल २०१८ च्या कार्यारंभ आदेशानुसार जर क्रश बॅरियर बसविले असते, तर हा अपघात घडला नसता, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील पोलादपूरपासून २४ कि.मी. रस्ता हा सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूरच्या हद्दीत येतो. यापैकी १८.९०० ते २४.९०० अंतरामध्ये बीएम व बीसीचे मजबुतीकरण करणे व डांबरीकरण करणे, गटार खोदाई व क्रश बॅरियरसाठी एकूण दोन कोटी दहा लाखांची प्रशासकीय मान्यता घेतली असून, एक कोटी ८२ लाख रुपये रकमेची निविदा मंजूर करण्यात आली.सदर कामावर एक कोटी ६५ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. क्रश बॅरियर कामासाठी यात १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावर गेली अनेक वर्षे सातत्याने सरंक्षक कठड्यांची मागणी होत होती. मे महिन्यात क्रश बॅरियरसाठी खड्डे मारले होते. मात्र, क्रश बॅरियर बसविले गेले नाहीत. अपघातात वाचलेल्या प्रकाश सावंत देसाई यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जिथे अपघात घडला तिथे रेलिंग तयार करण्यासाठी ड्रिल मारले आहेत. पाच-सहा होल आहेत. डांबरी रस्त्याच्या बाजूलाच आहेत. त्या खड्ड्यांची माती रस्त्यावरच बाजूला काढून ठेवली आहे. त्या मातीवर बसचा टायर गेला आणि त्यानंतर गाडी घसरतच गेली. डाव्या बाजूला कुठे कठडा नाही, रेलिंग नाही, जर ते असते तर आज हा अपघात झाला नसता, असे प्रकाश सावंत देसाई म्हणाले.आंबेनळी घाटातील याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी अपघात होऊन सहा जणांचा जीव गेला होता. संरक्षक कठडे नसल्यानेच हा अपघात घडला होता. त्या अपघातातून काहीच बोध सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेला दिसत नाही. एप्रिल महिन्यात क्रश बॅरियरचे काम मंजूर झाल्यानंतर पाच किलोमीटर अंतरात नुसते खड्डे मारून ठेवून त्यामधे क्रश बॅरियर का बसविले गेले नाहीत, याबाबत अपघातग्रस्त ठिकाणी आलेल्या प्रवाशांनी असा संतप्त सवाल केला आहे. दरम्यान, या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.
Satara Bus Accident: ...तर अपघात घडला नसता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 4:43 AM