- मनीषा म्हात्रेमुंबई : पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो मुंबईत आला होता; पण त्याला दापोली कृषी विद्यापीठातून कॉल आला. त्याचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली असल्याने त्याने जवळच्या फोंडा येथेच आपली पोस्टिंग करून घेतली. अशात दापोलीच्या साहेबांनी बोलावले, असे सांगून तो घरातून निघाला; पण थेट त्याच्या मृत्यूच्या बातमीने फोन खणखणल्याचे, आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृत विनायक सावंत (२७) याच्या नातेवाइकांनी सांगितले.कणकवलीमध्ये विनायक हा आई आणि भावासोबत राहायचा. त्याला लहानपणापासूनच पोलीस व्हायचे होते. त्यासाठी त्याने ९ वर्षांपूर्वी वरळीतील पोलीस काकांकडे धाव घेतली. वरळी बीडीडी चाळ क्रमांक २३ मध्ये विनायकचे काका बी. सावंत राहतात. ते मुंबई पोलीस दलातील सशस्त्र विभागात कार्यरत आहेत. विनायक चार ते पाच वेळा पोलीस भरतीत सहभागी झाला. मात्र, काही गुणांमुळे तो मागे राहायचा. त्याने प्रयत्न सोडले नाहीत. महाराष्ट्र सुरक्षा बलात चार महिने नोकरी केली. वर्षभरापूर्वी दापोली कृषी विद्यापीठातून कॉल आला. तेथे नोकरी करून भरतीचे प्रयत्न सुरूच ठेवायचे ठरविले. तो दापोली कृषी विद्यापीठात लिपिक पदावर रुजू झाला. तिथे काही महिने काम केले. मात्र, प्रवासात खर्च आणि वेळ वाया जात असल्याने त्याने फोंडा येथे बदली करून घेतली. फोंडाजवळ राहत असलेल्या चुलत्यांकडे तो राहत होता.शनिवारी घरातून निघताना, दापोलीच्या साहेबांनी बोलावले म्हणून तेथे जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला. अनेकदा साहेबांनी बोलावले की, त्याला दापोलीला जावे लागत असे. मुलगा कामाला गेला आहे, नेहमीप्रमाणे घरी येईल. या विचारात कुटुंबीय होते. तो पिकनिकला जात आहे, याबाबत ते अनभिज्ञ होते. अशातच, शनिवारी सकाळी दापोलीच्या कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसचा अपघात झाल्याची माहिती कानावर पडली. मात्र, मुलगा तर कामाला गेला आहे... तो यामध्ये नसणार, असे स्वत:लाच धीर देत कुटुंबीय एकमेकांची समजूत काढत होते. त्यानंतर माध्यमांवर ग्रुपच्या फोटोमध्ये मुलाचा फोटो दिसला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.विनायक गेला यावर विश्वासच बसत नाही..या अपघातात आमचा विनायक गेला, यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे त्याचे काका सावंत यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या मुलाप्रमाणे विनायकचा सांभाळ केला होता. या घटनेने सावंत कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
Satara Bus Accident: साहेबांनी बोलावले म्हणून गेला...तो परतलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 2:27 AM