सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षच भाजपच्या कळपात जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 04:50 PM2019-03-23T16:50:53+5:302019-03-23T16:51:41+5:30
माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पक्षांतर्गत सुरु असलेल्या वादावादीमुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी त्यांनी केलेली होती.
सातारा : काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी ते पक्षांतर करणार आहेत. काँग्रेसला हा मोठा झटका असला तरीही त्याचा माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मतांवर मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पक्षांतर्गत सुरु असलेल्या वादावादीमुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी त्यांनी केलेली होती; याबाबत वरिष्ठ पातळीवरही प्रयत्न केले. मात्र, त्याला यश आलेले दिसत नाही. आघाडी धर्माप्रमाणे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीलाच मदत करणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
आता माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र, अकलूजच्या वाड्यावर भलत्याच घडामोडी सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना अकलूजमधूनच रसद देण्यात आल्याची आता चर्चा सुरु झाली आहे.
निर्णय घेतला; पण...
मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मी अकलूजमध्येच आहे. सविस्तर चर्चेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देईन, अशी माहिती रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.