सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. सकाळपासून लीडवर असलेले शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) सकाळपासून बहुतांश फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते. परंतु, वेळ फिरली आणि अचानक उदयनराजेंनी (Udayan Raje Bhosale) शिंदेंचे लीड तोडत आघाडी घेतली. हे कळताच उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
14 व्या फेरीत उदयनराजेंनी ४००० मतांची आघाडी घेतली. यानंतर जलमंदिर पॅलेसवर राजे समर्थकांनी जोरदार जल्लोष सुरु केला. यावेळी उदयनराजे भावूक झाले होते. त्यांच्या पत्नीनेही त्यांना मीठी मारली. पंधराव्या फेरीअखेर उदयनराजेंनी 9736 मतांची आघाडी घेतली आहे. उदयनराजेंना 4,79,304 तर शशिकांत शिंदेंना 4,69,568 मते मिळाली आहेत.
उदयनराजे भोसले यांना पहिल्या फेरीत २७ हजार ५५६ तर शशिकांत शिंदे यांना २७ हजार ५०७ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत उदयनराजे यांना ५३ हजार ३०४ तर शशिकांत शिंदे यांना ५७ हजार ७४६ मते मिळाली. तिसऱ्या फेरीत उदयनराजे यांना ७४ हजार ३१० तर शशिकांत शिंदे यांना ८२ हजार ९४६, चौथ्या फेरीत उदयनराजे यांना ९९ हजार २७३ तर शशिकांत शिंदे यांना १ लाख १२ हजार ४७५ मते मिळाली.
पाचव्या फेरीअखेर उदयनराजे यांना १ लाख २८ हजार ३७५ तर शशिकांत शिंदे यांना १ लाख ४१ हजार ८२ मते मिळाली. दुसऱ्या फेरीनंतर शशिकांत शिंदे यांनी घेतलेली आघाडी नवव्या फेरीपर्यंत कायम राहिली. नऊ फेऱ्यांचा निकाल हाती आला तेव्हा शशिकांत शिंदे यांनी १९ हजार ७१ मतांनी आघाडी घेतली होती. या आघाडीमुळे शिंदे समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला होता.