Satara Election 2019 : साताऱ्यात बाबा विरुद्ध राजे? उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 03:55 AM2019-09-27T03:55:37+5:302019-09-27T06:45:41+5:30
Satara Election 2019 : साताऱ्यातून लढण्यासाठी शरद पवारांचा आग्रह
- नितीन नायगावकर
नवी दिल्ली : भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांना साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. ही जागा राष्ट्रवादीची असली तरीही दोन्ही पक्षांतील नेत्यांचा चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह आहे. काँग्रेसच्या छाननी व केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले.
या जागेवरून पवारांनी लढावे असा राष्ट्रवादीतील नेत्यांचा आग्रह होता. पण, ईडीच्या कारवाईनंतर या निवडणुकीला वेगळे वळण मिळाले आहे. स्वत: शरद पवार यांनी चव्हाण यांचे नाव सुचविल्याचे बोलले जात आहे. पवारांकडून हिरवा झेंडा मिळाल्याने काँग्रेसश्रेष्ठी चव्हाणांच्या नावाची लवकरच घोषणा करू शकतील. साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात लाट तयार होत आहे. चव्हाण यांच्या नावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे,’ असे वडेट्टीवार सांगितले. छाननी समितीच्या बैठकीत १०५ जागांवर निर्णय झाला असून २० जागांवर चर्चा सुरू आहे. सर्व जागांवर अंतिम निर्णय झाला तरीही पितृपक्षानंतरच यादी जाहीर केली जाऊ शकते.