सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील विरुद्ध माजी खासदार उदयनराजे भोसले असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने श्रीनिवास पाटील 3 ऑक्टोबराल उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीतर्फे उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू होत्या. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांच्या नावाची घोषणा केली.शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना मंगळवारी फोन करून श्रीनिवास पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा अशी सूचना केली आहे. 3 ऑक्टोबर रोजी पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादीचे विधानसभेसाठी इच्छुक असलेले सगळे उमेदवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. पाटील यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार मकरंद पाटील वाई विधानसभा मतदारसंघातून, बाळासाहेब पाटील कर्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातून तर सत्यजित पाटणकर पाटण विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.दरम्यान चार ऑक्टोबर रोजी रयत शिक्षण संस्थेमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पवार चार तारखेला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
साताऱ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; शरद पवारांचे 'खास मित्र' देणार उदयराजेंना टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 10:49 AM