नितीन काळेल ।सातारा : सातारा जिल्हा परिषदेने विविध उपक्रम, अभियानात देशात डंका वाजवला असतानाच आता सौरऊर्जा निर्माण करून सर्वत्र लखलखाट पसरवलाय. कारण, सौरऊर्जा पॅनेलचे काम संपून प्रत्यक्षात मंगळवारपासून यंत्रणाही सुरू झालीय. यामुळे वर्षाला वीज बिलाचे २५ ते ३० लाख रुपये वाचणार असून, साताऱ्याची मान राज्यात उंचावली आहे. आता उद्घाटनाचा कार्यक्रम लवकरच होणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेने गेल्या काही वर्षांत विविध उपक्रम, अभियानाच्या माध्यमातून देशभर नावलौकिक केला आहे. तर अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी साताºयाने स्वच्छतेत देशात डंका वाजवला होता. सतत नवनवीन उपक्रम राबविणे, अभियान यशस्वी करणे यामध्ये जिल्हा परिषद आघाडीवर आहे. आतातर जिल्हा परिषदेत सौरऊर्जेचा लखलखाट पसरलाय.
जिल्हा परिषदेत विविध विभाग आहेत. परिसरही मोठा आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेला दर महिन्याला सुमारे दोन ते अडीच लाख रुपये तर वर्षाला २५ ते ३० लाख रुपये हे वीज बिलासाठी खर्च करावे लागत होते. याचा विचार करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यादृष्टीने पावले पडू लागली. या प्रयत्नातूनच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यासाठी सुमारे ४७ लाख रुपयांची तरतूद झाली होती.गेल्या साडेचार महिन्यांपासून जिल्हा परिषद इमारतीच्या टेरेसवर सोलर युनिट उभारण्याचे काम सुरू होते. ते आता पूर्ण झाले आहे.
‘मेडा’ विभागाच्या वतीने हे काम करण्यात आले. उभारण्यात आलेले हे युनिट १०० केव्हीचे आहे. दररोज त्यामधून १०० केव्ही वीज तयार होणार आहे. त्यातून पूर्ण जिल्हा परिषदेत वीज मिळू शकते. तर सध्या जिल्हा परिषदेला दर दिवसाला ९० केव्हीपर्यंत वीज लागते. याचा विचार करता सूर्यप्रकाशापासून तयारी होणारी वीज काही प्रमाणात शिल्लक राहणार आहे. ती विकताही येऊ शकते.
वीज कंपनीने उर्वरित राहिलेले काम पूर्ण केले असून, सर्व तपासण्याही पूर्णत्वास गेल्या आहेत. त्यामुळे मंगळवारपासून प्रत्यक्षात सौरऊर्जेचा वापर जिल्हा परिषदेत सुरू झालाय. या सौरऊर्जेवर सर्व विभाग उजळून निघालेत.जनरेशन, नेट मीटरचे टेस्टिंग...जिल्हा परिषदेच्या टेरेसवर सौरऊर्जा युनिटचे पॅनेल उभारण्यात आले आहे. त्यानंतर जनरेशन आणि नेट मीटरचे टेस्टिंग वीज कंपनीच्या वतीने करण्यात आले. सर्व तपासण्या झाल्यानंतर सौरऊर्जेचा लखलखाट सुरू झाला.
सातारा जिल्हा परिषदेने सौरऊर्जा निर्माण केली असून, आता यंत्रणाही कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालीय. वर्षाला वीजबिलापोटी लाखो रुपये जात होते. ते आता वाचणार आहेत. लवकरच उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे.- संजीवराजे नाईक-निंबाळकर, अध्यक्ष, जिल्हा परिषदआपल्याकडे अपारंपरिक
घटकातून वीज मिळविण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने सूर्यप्रकाशावर वीज तयार करण्याचा निर्णय घेतला. सौरऊर्जा युनिट उभारणी पूर्ण झाली असून, प्रत्यक्षात वीजपुरवठाही सुरू झालाय. यामुळे जिल्हा परिषदेचे दरवर्षी ३० लाख रुपये वाचणार आहेत.- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी