पुणे : कॉलेज आॅफ इंजिनिअरींगच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘स्वयम’ हा लघू उपग्रह श्रीहरीकोटा येथून सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी अवकाशात झेपावला आणि सीओईपीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी एकच जल्लोष केला. या यशामुळे सीओईपीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून ‘पीएसएलव्हीसी -३४’ हा प्रक्षेपक स्वयंमसह एकूण २० उपग्रह घेऊन अवकाशात झेपावला. त्यात १८ उपग्रह हे विदेशी असून तामिळनाडू येथील सत्याभामा विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी तयार केलेल्या एका उपग्रहाचाही समावेश आहे. सीओईपीच्या १७० हून अधिक विद्यार्थ्यांनी गेल्या आठ वर्षांपासून हा उपग्रह तयार करण्यासाठी कष्ट घेतले. आठ वर्षांपूर्वी सीओईपीच्या एका विद्यार्थ्याने तत्कालीन संचालक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या समोर मांडलेली कल्पना साकार झाली. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. आमच्या भावना शब्दात मांडता येत नाहीत, असे अजिंक्य हिरे, विशाल देसाई, तनया कोलंकारी, तन्मय गाजरे, अपूर्व जोशी आदी विद्यार्थ्यांनी सांगितले. सीओईपीमध्ये उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाशी स्वयंमचा संपर्क पुढील १५ दिवसांत होईल, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘स्वयम’ उपग्रह झेपावला!
By admin | Published: June 23, 2016 4:51 AM