मुंबई - पैठण तालुक्यातील ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना सत्ताधारी पक्षाचे आमदार,खासदार असताना सुद्धा पूर्ण होऊ शकली नसल्याचा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी विधानपरिषदेत केले. ही योजना तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असताना सुद्धा मागील दहा वर्षापासून रखडेलेली असून, हे मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम असल्याचे चव्हाण म्हणाले.
पैठण तालुक्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना मागील दहा वर्षापासून सरकारच्या उदासीन धोरणामुळे रखडलेली आहे. सरकारने ४०० कोटीची योजना असताना सुद्धा यावर्षीच्या तरतूदीत फक्त १५ कोटी रुपये दिले आहे. या भागातील आमदार संदीपान भुमरे शिवसनेचे तर खासदार रावसाहेब दानवे हे भाजपचे, मग सत्ताधारी पक्षाचे आमदार,खासदार असताना सुद्धा जायकवाडीच्या पायथ्याशी असलेल्या गावांची ही परिस्थिती असेल तर उर्वरित मराठवाड्याचे काय होणार असे चव्हाण म्हणाले. सरकारने ही योजना त्वरित पूर्ण करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली.
यावर उत्तर देताना, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, योजना जरी ४०० कोटीची असली तरीही एकाचवेळी संपूर्ण निधी देता येत नाही. मात्र आमचं सरकार आल्यापासून सर्वाधिक काम झाले आहे. या योजनेतील पंप हाउस पासून सर्व गोष्टी आता पूर्ण झाल्या आहेत. असे शिवतारे म्हणाले.
ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण होऊ शकली नसल्याने लोकसभा निवडणुकीत या परिसरातील ५५ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र आमदार बच्चू कडू दिलेल्या आश्वासनामुळे गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.