ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २० : आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणी भाऊसाहेब आंधळकर आणि नामदेव कवठाळे या दोन्ही माजी पोलीस अधिकाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही माजी पोलिस आधिकाऱ्यांना आज पुण्याच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. जुलै रोजी तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि सहायक पोलिस निरीक्षक नामदेव कवठाळे यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आरोपपत्र दाखल केले होते.
२००९-१० मध्ये पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील काही जमिनी आयआरबीने बळकावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तळेगाव दाभाडे येथील आरटीआय कार्यकर्ते आणि भ्रष्टाचार विरोधी दक्षता समितीचे जिल्हा संघटक सतीश शेट्टी यांची १३ जानेवारी २०१० रोजी हत्या झाली होती. यानंतर पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभगाने सहाजणांना अटक केली होती. स्थानिक पोलिसांकडून तपासात कुचराई करतात असा आरोप करत सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती.
तपासातील सूत्रे हाती घेतल्यावर सीबीआयने ग्रामीण पोलीस ठाण्यातील संगणकाच्या हार्ड डिस्क, लॅपटॉपसह अनेकांचे मोबाईल जप्त केले होते. तपास शेवटच्या टप्प्यात असताना सीबीआयने क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर करून सबळ पुराव्या अभावी तपास थांबवण्यास परवानगी मागितली. मात्र संदीप शेट्टी यांनी पुन्हा केलेल्या याचिकेची दखल घेत हे प्रकरण सीबीआय दिल्ली पथककडे देण्यात आला होता.