ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळवण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेले शिवसेनेचे दिग्गज नगरसेवक मंगेश सातमकर यांचा ऐनवेळी पत्ता कट झाला आहे. त्यांच्याऐवजी भांडूपचे शिवसेना नगरेसवक रमेश कोरगावकर यांना पक्षाने स्थायी समितीसाठी उमेदवारी दिली आहे.
मुंबईच्या महापौरपदासाठी मंगेश सातमकर आणि रमेश कोरगावकर या दोघांची नावे चर्चेत होती. पण उपनगरातील भाजपाची वाढलेली ताकत लक्षात घेऊन शिवसेनेने वांद्रयाचे नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांना महापौरपदाची संधी दिली.
सायन कोळीवाडयातून चौथ्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेलेल्या सातमकरांना स्थायी समिती आणि शिक्षण समितीमधील कामाचा अनुभव आहे. प्रशासनाचा उत्तम अनुभव असल्यामुळे स्थायी समितीमध्ये त्यांची वर्णी लागेल अशी दाट शक्यता होती. पण शेवटच्या क्षणी सूत्रे फिरली आणि कोरगावकरांना स्थायी समितीवर संधी मिळाली.