लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी (पुणे) : कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील विविध परवानगींसाठी पणन मंडळाकडून मोठ्या रकमा मागितल्या जात आहेत, असा थेट आरोप राज्यस्तरीय परिषदेच्या मंचावरून होताच पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी संतापून, ‘मला मंत्रिमंडळाच्या बैठकीला जायचे आहे,’ असे सांगत काढता पाय घेतला. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. ते जात असतानाच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. ‘अब्दुल सत्तार यांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. काहींनी सभागृहाबाहेर लावलेले त्यांच्या छायाचित्रांचे फलक फाडून टाकले.
बाजार समित्या सोमवारी बंदसमस्या ऐकून न घेताच सत्तार निघून गेल्यामुळे त्यांच्याविरोधात निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
नेमके काय घडले माडगूळकर नाट्यगृहात?राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिवांसाठी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन निगडीतील माडगूळकर नाट्यगृहात करण्यात आले होते. उद्घाटक असलेले पणनमंत्री अब्दुल सत्तार दोन तास उशिरा पोहोचले. आल्यानंतर त्यांनी केवळ एकाच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी बोलण्यास उभे राहिले. बाजार समित्यांना बारा-एकची परवानगी देण्यास पणन मंडळाकडून पैसे घेतले जातात, असे ते सांगत असताना सत्तार चिडले. ‘तुम्ही तुमचे प्रश्न मांडा’, असे म्हणत ध्वनिक्षेपकाचा ताबा घेऊन ‘मला मंत्रिमंडळाच्या बैठकीला जायचे आहे’, असे सांगत निघून गेले.
मंत्री सत्तार यांनी बाजार समित्यांचा अवमान केला आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असून, त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी आमची मागणी आहे. - प्रवीणकुमार नहाटा, सभापती, राज्य बाजार समिती सहकारी संघ